• Fri. Dec 27th, 2024

    पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी, अजूनही मंत्रिपदाचा निरोप नाही, बडे नेते गॅसवर, पाहा कोण?

    पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी, अजूनही मंत्रिपदाचा निरोप नाही, बडे नेते गॅसवर, पाहा कोण?

    पुण्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. जातीय समीकरणांचाही विचार केला जात आहे. भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता असून युवा चेहऱ्यांना संधी मिळू शकते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : मंत्रिमंडळाचा शपथविधी काही तासांवर येऊन ठेपला असला, तरी पुण्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. कोणालाही थेट निरोप न मिळाल्याने मंत्रिमंडळात नक्की कोणाची वर्णी लागणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना कोणते खाते मिळणार, याची उत्सुकता आहे. चंद्रकांत पाटील यांचा ‘हेविवेट’ खात्यावर दावा आहे. पर्वती मतदारसंघातून आमदारकीचा चौकार मारलेल्या माधुरी मिसाळ यांना अनुभवी महिला लोकप्रतिनिधी या नात्याने मंत्रिपदाची संधी मिळू शकते. भोसरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले महेश लांडगे यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल इंजिनीअरिंगचा विचार करून पिंपरीतून अण्णा बनसोडे आणि मावळमधून सुनील शेळके यांच्या नावांची चर्चा आहे. शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केलेले दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत असले तरी प्रकृतीच्या कारणास्तव ते मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून पुरंदर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाही मंत्रिपदाची आशा आहे. दौंड तालुक्यातून तिसऱ्यांदा आमदार झालेले राहुल कुल हेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक आणि ग्रामीण भागात भाजपचे जाळे विस्तारण्यासाठी कुल यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.

    जातीय समीकरणांचा विचार

    याशिवाय जातीय समीकरणांचा विचार करता पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले सुनील कांबळे हेदेखील मंत्रिमंडळात स्थान पटकावू शकतात. पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हेदेखील मंत्रिपदासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

    भाजपचे धक्कातंत्र

    भारतीय जनता पक्षाकडून यंदा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये युवा, तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचे समजते. तसे झाल्यास कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला लॉटरी लागणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    फडणवीसांचे विमानतळावर स्वागत

    मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले. दत्तजयंतीनिमित्त दत्तगुरूंची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले गेले. आमदार व माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, दीपक पोटे, उमेश गायकवाड, योगेश मुळीक, जयंत येरवडेकर आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शपथविधीसाठी २४ तासांहून कमी कालावधी शिल्लक असतानाही, पुण्यात भाजपच्या कोणत्याही आमदाराला शपथ घेण्याचा निरोप मिळालेला नाही. याबाबत काहींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनीही कोणाला दाद लागू दिली नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक गॅसवर असल्याची चर्चा आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed