Mumbai Kurla BEST Electric Bus Accident : सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातापूर्वी दिवसभर, बसचा वेग ताशी ३२ किमीपेक्षा जास्त नव्हता.
Kurla Bus Accident : संजय मोरेने दिवसभर ताशी ३२ किमीने बस चालवली, ८० ला स्पीडलॉक, कुर्ल्यात अपघातावेळी वेग मात्र…
अपघातावेळी किती वेग होता?
सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातापूर्वी दिवसभर, बसचा वेग ताशी ३२ किमीपेक्षा जास्त नव्हता. हा वेग बेस्टच्या धोकादायक निकषापेक्षा खूपच कमी होता. तर घटनेच्या वेळी तो ताशी ४६ किमी इतका होता. बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर घेतलेली १२ मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस डॉ. आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्थेच्या कमानीला धडकण्यापूर्वी अनेक वाहनांना धडकली होती. बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी चालक संजय मोरे (५४) हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे.
दिवसभर वेग अत्यल्प
संबंधित बसचा वेग ताशी ८० किमीवर लॉक करण्यात आला होता, परंतु त्याच उत्पादकाच्या काही इतर ५० किंवा ६० किमी प्रतितास या वेगाला लॉक केल्या गेल्या आहेत, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. “९ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवसभरात अपघाताची वेळ वगळता चालकाचा सर्वाधिक वेग केवळ ३२ किमी प्रतितास होता” असेही अधिकारी म्हणाले.
सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी अनिवार्य असलेल्या व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (व्हीएलटीडी) द्वारे बेस्ट आपल्या सर्व बसेसच्या वेगावर सतत लक्ष ठेवते. जर चालकाने ४० किमी प्रतितास ही मर्यादा ओलांडली तर त्याला “अतिवेगवान” मानले जाते. ५० किमी प्रतितास वेग ओलांडल्यास चालकाला “धोकादायक ड्रायव्हर” म्हणून लाल शेरा दिला जातो आणि त्याचे समुपदेशन केले जाते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
“महामार्गांवर, किंवा भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा ५० किमी प्रतितास वेग ओलांडणे हे खरे तर धोकादायक ड्रायव्हिंग मानले जात नाही, परंतु तरीही आम्ही चालकांना वेग मर्यादित करण्याबद्दल सल्ला देतो” असेही ते पुढे म्हणाले.
बेस्टची समिती स्थापन
कुर्ला दुर्घटनेच्या चौकशीसाठी बेस्टने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांच्या दालनात झालेल्या समितीच्या बैठकीत, पाच ‘वेट लीज’ ऑपरेटर – जे कंत्राटदार बेस्टला बस आणि ड्रायव्हर दोन्ही पुरवतात – म्हणाले की त्यांची वाहने ५० ते ७५ किमी प्रतितास या वेगवेगळ्या वेगावर लॉक केली जातात. बेस्ट आता सर्व भाडेतत्त्वावरील बसचा वेग एकसमान पातळीवर मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहे आणि याबाबत ऑपरेटरकडून उत्तर मागवले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे, रस्त्यांवरील वाढती गर्दी, वाढते वाहतूक सिग्नल, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाले आणि कधीही न संपणारी रस्त्यावरील कामे यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील बेस्टच्या वाहनांचा सरासरी वेग २०१४ मध्ये ११.५ किमी प्रतितास होता, तो २०२४ मध्ये ९ किमी प्रतितास इतका घसरला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Kurla Accident : बस अपघातानंतर चालक संजय मोरेने सर्वात आधी काय केलं? सीसीटीव्हीमध्ये कैद धक्कादायक प्रकार
सरासरी, एक बेस्ट बस दररोज १६९ किमी धावते, जी २०२३ मध्ये दररोज १८४ किमी होती. परिणामी, सेवेची वारंवारता कमी झाली आहे, त्यामुळे अधिक बसेसची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर बंद करण्यात आलेल्या कुर्ला बस स्थानकाला (पश्चिम) जोडणारे सर्व मार्ग बेस्टने पूर्ववत केले आहेत.
बेस्ट आणि ऑलेक्ट्रा या दोघांनीही अपघाताबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर केला असून तो मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारकडे पाठवला जाईल, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Fatima Ansari : माझी आई रक्ताच्या थारोळ्यात होती, नि तो बांगड्या काढतोय, लाज तरी वाटते का? फातिमांची कन्या रडू लागली
चालकाला किती सराव?
बेस्टच्या म्हणण्यानुसार, चालक संजय मोरे यांनी १ डिसेंबरपासून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बसेस (क्लचविना) चालवण्यास सुरुवात केली होती. त्याआधी त्याने इतर दोन वेट लीज ऑपरेटर्सच्या डिझेलवर चालणाऱ्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलर बसेस चालवल्या होत्या, ज्यांच्या सेवा बेस्टने वेगवेगळ्या कारणांमुळे बंद केल्या होत्या. संजय मोरे याने इलेक्ट्रिक बस चालवण्याची परवानगी देण्यापूर्वी तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.