Cabinet Expansion: महायुतीचं सरकार स्थापन होऊन आठवडा उलटला आहे. पण अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडलेला नाही. खातेवाटपासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या १२ जणांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होत आहे. त्यामुळे १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न होऊ शकतो. त्यावेळी सेनेकडून ११ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्यात ५ नवे चेहरे दिसू शकतात. शिंदे नगर विकास किंवा पीडब्ल्यूडी घेण्यास तयार झाले आहेत. पण त्यांनी महसूल विभागावरील दावा सोडलेला नाही.
फडणवीसांच्या टीममध्ये आणखी एक विश्वासू; ठाकरेंनी हटवलेल्या अधिकाऱ्याची CMOमध्ये वर्णी
नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २०, शिवसेनेचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० जण असतील. मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्री झालेले शिंदे गृह विभागासाठी प्रचंड आग्रही होते. पण गृह विभाग सोडण्यास भाजप तयार नाही. मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्यानं सेनेला १४ मंत्रिपदं मिळावीत, अशी शिंदेंची मागणी होती. पण भाजपनं १२ मंत्रिपदांची ऑफर दिली. सर्व जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये, वादग्रस्त चेहरे मंत्रिमंडळात नको, अशा अटी भाजपनं ठेवल्या होत्या. त्या अटी शिंदेंनी मंजूर केल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.
Cabinet Expansion: १७०० कोटींची कामं, मंत्रिपदाला पक्षातून विरोध होताच महंतांकडून लॉबिंग, सेनेचा ‘तो’ नेता कोण?
फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेकडून उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जैस्वाल, योगेश कदम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यातील सामंत, देसाई, पाटील, भुसे आधीच्या मंत्रिमंडळातही होते. त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. तर तानाजी सावंत, दीपक केसरकर, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार आहे. या सगळ्याच माजी मंत्र्यांविरोधात शिंदेंच्या आमदारांच्याच तक्रारी होत्या. तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळू नये, अशी भूमिका भाजपकडूनही घेण्यात आलेली आहे.