Cabinet Expansion: महायुती सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत आला आहे. पण अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणाऱ्या एकनाथ शिंदेंना गृह मंत्रालय हवं आहे. पण त्यांना गृह देण्याची भाजपची तयारी नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला होते. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील दिल्लीत आहेत. पण एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले नाहीत. खातेवाटपाचा पेच अद्याप कायम आहे. भाजप नेतृत्त्वाशी चर्चा करुन कॅबिनेटचा विस्तार करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. पण महत्त्वाच्या खात्यांचा तिढा कायम आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Cabinet Expansion: महायुतीत खातेवाटपाचा तिढा, सोडवण्यासाठी ‘जुना’ फॉर्म्युला; शिंदेंना आवडतं खातं मिळणार, पण…
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रिपद होतं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना गृह विभागाची जबाबदारी मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. अजित पवारांना अर्थ मंत्रालय मिळत असेल तर मला गृह मंत्रालय मिळावं अशी स्पष्ट मागणी शिंदेंकडून करण्यात आली आहे. सुत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाजपकडे असलेलं संख्याबळ आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी असलेला त्यांचा आग्रह पाहता अजित पवारांना अर्थ मंत्रालय सोडावं लागू शकतं.
सेनेच्या ‘त्या’ ५ मंत्र्यांना पक्षातूनच जोरदार विरोध; भाजप पाहुण्याच्या काठीनं विंचू मारणार?
‘देवेंद्र फडणवीस गृह आणि नगरविकास मंत्रालय स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी शिंदेंना महसूल खातं स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. अजित पवारांनी अर्थ मंत्रालय सोडावं आणि त्या बदल्यात गृहनिर्माण, कृषी खातं घ्यावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप सत्तेतील सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे गृह, नगरविकास, अर्थ अशी जवळपास सगळीच महत्त्वाची खाती स्वत:सोबत ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे,’ असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.