Pankaja Munde News : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परळीतील व्यापारी अमोल डुबे यांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या घटनांवर चिंता व्यक्त करत विशेष तपास पथकाकडून चौकशीची मागणी केली आहे.
मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी आमदार पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनांविषयी पंकजाताईंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मस्साजोग तालुका केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली. या दोन्ही घटनांबरोबरच जिल्हयात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करून आ. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आणि सकाळपासून सुरू केलेल्या रास्ता रोकोला मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली आणि चर्चा केली. त्या चर्चा नंतर अखेर या आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एसपी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. तर केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे.