मुंबई, १० : ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा तथा एस.एम.कृष्णा यांच्या निधनाने, आपल्या राजकारणातून समाजहित जपणारा आणि देशाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, श्री. एस. एम. कृष्णा यांनी लोकहिताच्या कामासाठी पदे असतात हे ओळखून त्यांनी लोकांचे जीवन उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. विशेषतः बंगळुरूचे माहिती आणि तंत्रज्ञान शहरात रूपांतर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
0000