Farmer Son Became Police Officer: एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा सरकारी नौकरी मिळवतो तेव्हा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. अशाच एका होतकरु शेतकरी पुत्राने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे.
लातूरमधील शेतकरी सतीश सोनावणे यांचा मुलगा किरण सोनवणे याने अनुकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलं आहे. यासाठी त्याने चार वर्ष अथक परिश्रम केले आहेत. दररोज अभ्यास हाच एक ध्यास मनाशी बाळगून त्याने यशाला गवसणी घातली आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
किरणने जिल्हा परिषद दगडवाडी येथे प्राथमिक शिक्षण घेतले. शेजारील गावात त्याला दररोज चार किलोमीटरची पायपीट करून शाळेत जावे लागत असे. उच्च शिक्षणासाठी त्याने लातूर येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो लातूर येथेच मागील चार वर्षापासून वास्तव्यास होता.
दिवसातून ११ तास अभ्यास
मागील चार वर्षे मित्रांपासून लांब राहत त्याने अभ्यासात सातत्य ठेवले. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून सुद्धा तो मागे हटला नाही. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास असाच दररोजचा कार्यक्रम ठरलेला असायचा. विविध स्वरूपाची पुस्तके ही ग्रंथालयातून उपलब्ध करून घेतली व या माध्यमातून अभ्यास केला आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला अधिकारी
सतीश सोनवणे हे मोगरगा गावातील अल्पभूधारक शेतकरी आहेत. दोन एकर शेतीमध्ये जेमतेम उत्पादन मिळते. यातूनच त्यांनी मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला. पण पुढे खर्च पेलवत नसल्याने याला जोड म्हणून लोकांच्या शेतात मजुरीचे काम करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. लोकांच्या शेतात जाऊन त्याला पुस्तके वह्या व शैक्षणिक साहित्य त्यांनी पुरवले. यामुळे किरण घडल्याचे सतीश सोनवणे यांनी सांगितले. सतीश लहानपणापासूनच शिक्षणामध्ये आवड असलेला विद्यार्थी, त्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. कुठलाही सण समारंभ कुटुंबासोबत साजरा न करता त्याने आपला सण समारंभ हा पुस्तकांसोबतच साजरा केला, यामुळे त्याला हे यश मिळाले असे त्याचे वडील सांगतात.
‘आयुष्यामध्ये संगत फार महत्त्वाची’
आयुष्यामध्ये मित्र निवडत असताना चांगल्या सवयीचे असावेत असे म्हणले जाते याच गोष्टीला लक्षात ठेवून किरण याने अभ्यास करणारी इतर कुठलेही नाद नसलेल्या मित्रांसोबत त्यांनी संगत केली यामुळेच दररोज अभ्यास करण्यासाठी त्याला प्रेरित मित्रांनी केल्याचे किरण यांनी सांगितले. जिथे जिथे आयुष्यात अपयश मिळालं तिथे तिथे मित्र खंबीरपणे सोबत उभे राहिले ज्यामुळे आयुष्यात दुसऱ्या कोणत्या मोटिवेशन ची गरज लागली नसल्याचे किरण सांगतो.