Mahayuti Oath Taking Ceremony: आज महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पण, अद्यापही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही यावर निर्णय झालेला दिसत नाही.
हायलाइट्स:
- आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
- एकनाथ शिंदेंबाबत अजूनही सस्पेन्स कायम
शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? संभ्रम कायम
आज गुरुवार ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणीस आणि अजित पवारांसोबत शिंदे शपथ घेणार की नाही ते पाहावं लागणार आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच काही मंत्र्यांचाही शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी
शिंदे हे गृहमंत्रिपदाबाबत ठाम असून शपथविधी अवघ्या काही तासांवर आला तरीही यावर तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच इतरही काही मंत्र्यांचा शपथविधी व्हावा अशी एकनाथ शिंदेंची इच्छा असल्याची माहिती आहे. फडणवीसांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी शिवसेनेसाठी काही खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा केली. मात्र, त्यावरही काही निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांशी बोलून कळवतो असं फडणवीसांनी शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे. आता आज दिवसभरात यावर काही निर्णय होतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Eknath Shinde: शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? सस्पेन्स कायम, फडणवीसांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
भायखळ्यातील शिंदेंचं बॅनर चर्चेत, उपमुख्यमंत्री असा उल्लेख
शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत अद्यापही अनिश्चितता असताना दुसरीकडे भायखळ्यात मात्र एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री म्हणून लावण्यात आलेले बॅनर, सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर शिंदे यांचा फोटो असून त्यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.