• Fri. Nov 29th, 2024
    शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी! एकनाथ शिंदे शनिवारी घेणार मोठा निर्णय, भाजपचे टेन्शन वाढणार

    Sanjay Shirsat on Eknath Shinde Daregaon Stay: गुरुवारी अमित शहांच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री नेमका कोण या प्रश्नाला आणखी धार चढली आहे. अशातच शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगर : राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. आता महाराष्ट्राचा कारभारी कोण? हा प्रश्न अवघ्या जनतेला पडला आहे. यातच सत्तास्थापनेच्या चर्चांचे गुऱ्हाळ आता सुरु आहे. तरी अद्याप अधिकृत माहिती समोर आली आहे. गुरुवारी अमित शहांच्या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री नेमका कोण या प्रश्नाला आणखी धार चढली आहे. अशातच शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढणार आहे. शिरसाट म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी मोठा निर्णय घेणार आहेत.’

    राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी अमित शाह यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर शुक्रवारी थेट साताऱ्यातील दरेगाव गाठले. यासाठी त्यांनी आजच्या तसेच पुढील दोन दिवसांच्या सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. दिल्लीहून परतल्यानंतर शिंदेंनी थेट आपलं दरेगाव गाठल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीत काही आलबेल नसल्याची चिन्ह दिसत आहेत.

    एएनआय वृत्तसंस्थेला माहिती देताना संजय शिरसाट म्हणाले की, काही राजकीय पेचाची परिस्थिती असेल तर एकनाथ शिंदे थेट त्यांच्या गावी जातात. ते अशावेळी गावी जाण्याला प्राधान्य देतात.दरेगावी गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांचा मोबाईल फोनही नाही. कधीही त्यांना काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर नेहमी दरेगावी पोहोचले आहेत. ते उद्या (शनिवारी) सायंकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत घडणाऱ्या घडामोडी पाहता यावर ते नक्कीच निर्णय घेतील.

    काळजीवाहू मुख्यमंत्री अचानक आपल्या मूळ गावी गेल्याने सलग दोन दिवसांतील नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असून अद्याप मुख्यमंत्रीपदावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. आता थेट रविवारी मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर निर्णय झाल्यास ५ डिसेंबर शपथविधीचा कार्यक्रम अपेक्षित आहे. तोपर्यंत सत्तास्थापनेचा विषय बारगळणार आहे.
    एकनाथ शिंदेंनी गाठलं दरेगाव, शिवसेना नेत्याने सांगितलं कारण; वाचा काय म्हणाले?
    दरम्यान, संजय शिरसाटांच्या आधी उदय सामंतांनी शिंदेंच्या दरेगावी जाण्यामागे काही मोठे कारण नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, शिंदे नाराज नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. त्यांना ताप देखील होता त्यांना सर्दी देखील झाली आहे. असे असताना ते नाराज आहेत म्हणून दरे गावाला गेले, असे सांगणे हे चुकीचे ठरू शकते. किंबहुना, गुरुवारी रात्री नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. चर्चेची पुढील फेरी रविवारी मुंबईत होणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed