महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आणि हा विजय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा असल्याचे म्हटले. फडणवीस यांनी सांगितले की जनतेने विषारी प्रचाराला नकार दिला आहे. त्यांनी विरोधी पक्षातील सदस्यांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले.
गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करत विजयामध्ये हातभार लावला. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आमचे साष्टांग दंडवत आहे. विषारी प्रचाराला जनतेने कृतीतून उत्तर दिलं होतं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, चक्रव्यूव्ह तोडून दाखवू आणि ते चक्रव्यूव्ह तोडून टाकलं आहे. लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असू की मोठा आवाज असू ते ज्या योग्य गोष्टी असतील त्यावर त्यांनी आम्ही योग्य प्रतिसाद देऊ, असंही फडणवीस म्हणाले.
जर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला की लोकशाहीचा विजय आणि जनमताचा कौल. महाराष्ट्रात पराभव झाल्यावर ईव्हीएममध्ये प्रोब्लेम, लोकशाही धोक्यात आली आहे. मला असं वाटतं की त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. लोकशाहीची खरी गंमत आहे की जनता कोणाला डोक्यावर घेईल आणि कोणाला धाराशाही करेल हे काही सांगता येत नाही. या निवडणुकीने हे पुन्हा एकदा दाखवून दिल्याचं फडणवीस म्हणाले.