Karjat-Jamkhed Vidhan Sabha Result 2024 Live, NCP SP Rohit Pawar vs BJP Ram Shinde : आज महाराष्ट्राचा महानिकाल समोर येणार आहे. यातच अटीतटीची लढत रंगलेल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघ.
कर्जत आणि जामखेड अशा दोन तालुक्यांचा मिळून हा संयुक्त मतदारसंघ आहे. १९९५ पासून या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत येथील चित्र बदलले, पवार घराण्यातील युवा नेतृत्वाने भाजपचा गड भेदला. रोहित पवारांनी मोठे मताधिक्य मिळवत राम शिंदेंना पराभूत केले. २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली. तर भाजपच्या राम शिंदे यांना दुसऱ्या क्रमाकांची ९२ हजार ४७७ मते मिळाली. रोहित पवारांनी राम शिंदेंचा ४३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
Thane Vidhan Sabha Election Result 2024: एकनाथ शिंदेंचा डंका, ‘गुरु’ दिघेंच्या पुतण्यावर केली मात; ठाण्यात शिंदेंच्या महायुतीचा वरचष्मा
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी मात्र काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. राम शिंदेंनी यांनी विकासकामांची नस पकडत प्रचार केला आहे. यामुळे शरद पवारांच्या नातवापुढे प्रतिस्पर्धी राम शिंदेंचे तगडे आव्हान होते. शरद पवारांनीही नातवाच्या प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु शरद पवारांची जादू या मतदारसंघात काम करणार नसल्याचे हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. मतमोजणीच्या १७ व्या फेरीअखेर राम शिंदेंना ८४ हजार २७५ मते मिळाली आहेत. तर रोहित पवारांना ८३ हजार १९१ मते मिळाली आहेत. राम शिंदे १ हजार ८४ मतांनी आघाडीवर आहेत. अद्याप पूर्ण निकाल हाती यायचे आहेत तरी दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या मतदारसंघात शेतीसाठी कुकडीचे पाणी मिळावे ही मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. तर दुसरीकडे मतदारसंघात MIDC देखील अद्याप प्रस्तावित आहे. या दोन मुद्द्यांवरच येथील निवडणूक फिरत आहे. यासोबतच सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून संघर्ष पेटला असल्याने त्याचा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच राम शिंदे हे ओबीसी आहेत. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण झाले असल्यास त्याचा फायदा राम शिंदेंना होऊ शकतो. त्यामुळे राम शिंदेंचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.