Vijay Wadettiwar Commented on Maharashtra CM Post: विधानसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या रणनीतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
‘मी सत्तेतला आमदार राहणार’
विजय वडेट्टीवारांनी आगामी सरकारबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे. ‘उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहणार आहे, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही तर खात्री आहे, आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत. महाविकास आघाडी १६० ते १६५ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, एक्झिट पोल वगैरे नंतर बघू.’ असे वडेट्टीवार म्हणाले. तर ‘आजच्या बैठकीत सगळ्या नेत्यांना उद्याच्या मतमोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती देखील विजय वडेट्टीवारांनी दिली.
पैसे वाटपाच्या आरोपावरुन विनोद तावडे संतापले,’…अन्यथा मानहानीचा दावा ठोकेन,’ थेट काँग्रेस नेत्यांना धाडली नोटीस
‘महाराष्ट्रातून महायुती हद्दपार होणार’
‘उद्या दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईलच आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल.’ असा देखील विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला असून ते पुढे म्हणाले, ‘हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद मी सांभाळलं आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये असणार,’ असेही वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाबाबत वडेट्टीवार म्हणाले, ‘काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं ही काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही तशी इच्छा आहे, पण तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येऊन जो निर्णय होईल आणि तो निर्णय अंतिम असणार आहे.’ तसेच ‘जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहेत, ते आमचेच आहेत. कुणी बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना जरुर आहे, असेही वडेट्टीवारांनी नमूद केले.