• Mon. Nov 25th, 2024

    राजकीय पुढाऱ्याची रात्रभर चाललेली मटणाची पार्टी बकऱ्यांवर उलटली, तालुक्यात खळबळ, काय घडलं?

    राजकीय पुढाऱ्याची रात्रभर चाललेली मटणाची पार्टी बकऱ्यांवर उलटली, तालुक्यात खळबळ, काय घडलं?

    Chandrapur News : चंद्रपूरमध्ये राजकारणामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. फिस्कुटी गावात राजकीय पक्षाच्या पार्टीत उरलेला शिळा भात खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पंधरा बकऱ्या आजारी आहेत. दुसरीकडे, वरोरा तालुक्यात एका उमेदवाराच्या प्रचारादरम्यान आयोजित पार्टीत माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    चंद्रपूर : चंद्रपूरमधील राजकारणाने आता टोक गाठलं आहे. अपक्ष उमेदवारांच्या बॅनरवर शेण फेकल्या गेलं. कुणाचे बॅनर फाडण्यात आले. आतातर या राजकीय नेत्यांचा करामतीमुळे गरीब शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गाव गावात चिकन-मटण पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्टीत उरलेला शिळा भात खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.तर पंधरा बकऱ्या मरणाच्या दारावर उभ्या आहेत. ही घटना मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्हारपूर मतदार संघात येणाऱ्या मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाचा उमेदवाराची पार्टी झाली होती, तशी चर्चा गावात आहे. या पार्टीत उरलेले अन्न खुल्या भागात फेकण्यात आले होते दोन दिवसांपासून ते अन्न तसेच पडून होते. दरम्यान या भागात चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांच्या कळपातील काही बकऱ्यांनी ते अन्न खाल्लं. त्यानंतर या बकऱ्यांचे पोट फुगले. बकऱ्या पूर्ण आजारी झाल्या आणि यातच त्यांचा मृत्यूही झाला. गावातील जनार्धन जिल्लेवर यांचा मालकीच्या दोन बकऱ्यांचा आणि दशरथ बोरुले यांच्या दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर पंधरा बकऱ्या मरणाचा दारावर उभ्या आहेत. या घटनेमुळे बकऱ्यांचा मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.

    पार्टी जीवावर बेतली, माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू

    एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टीत माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्हात घडली. वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसशी जुळलेल्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी आयोजन केलं होतं. यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. आवाज येताच सगळे धावले. एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे यांचा बुडून मृत्यू झाला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed