रशियात विरोधक नावालाही दिसत नाहीत, भारतातही मोदींना तेच करायचंय
‘मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे, ती देशाची राज्यघटना आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पंतप्रधान यांनी इतके खोटे बोलू नये. खोटे बोलायचे, विरोधकांना बदनाम करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचे, धमकी द्यायची. सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हा आपल्या देशाच्या राज्यघटनेस सर्वांत मोठा धोका आहे. रशियामध्ये राज्यघटना नाही, तिथे विरोधक नावालाही दिसत नाहीत. तसेच पुतिन मॉडेल पंतप्रधान मोदींना निवडणुकीनंतर या देशातही आणायचे आहे. परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल,’ असा दावा राऊत यांनी केला.
सांगलीत संघाचा माणूस निवडून येतोय, तिकडे शिवसेनेचाच उमेदवार लढणे गरजेचे
सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली असली तरी याच मुद्यावर महाविकास आघाडीत अद्याप धूसफूस आहे. यावर राऊत यांनी भाष्य केले. अजित कदम असतील, विशाल पाटील असतील, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुनेजाणते कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष सांगलीत काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगली घडवल्या जातात. सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहे. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर तिकडे शिवसेनेचा उमेदवार लढणे गरजेचे आहे ही जनभावना आहे, असेही राऊत म्हणाले.