मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला
संजय मंडलिक यांच्या पायाची खालची वाळू घसरली आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचे काम त्यांनी केले आहे. कोल्हापूरकर हे कधीच सहन करणार नाहीत. या निवडणुकीची सुरुवात झाली. यावेळी चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ सर्वांनी शाहू महाराजांवर वैयक्तिक टीका करायची नाही अशी सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक यांनी आज त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी अशी टीका केली. याचा निषेध आम्ही करतो, त्यांनी त्वरित माफी मागावी, त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागेल, असे ते म्हणाले.
मंडलिकांच्या वक्तव्याचे फक्त कोल्हापुरात नाही तर राज्यात पडसाद
त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यांच्या हातातून निवडणूक जात आहे, असे त्यांना दिसत असल्याने ही निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मात्र ते यशस्वी होणार नाहीत. तुम्ही कुस्ती करा, कुस्ती करण्याबद्दल आमची काही हरकत नाही. मात्र खालच्या पातळीवर जाऊन वारंवार वक्तव्य का करत आहात? मंडलिकांच्या पाठीमागे असलेल्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. जर स्पष्टपणे कोल्हापुरी भाषेत उत्तर देण्याची वेळ आली तर कोल्हापूरकर उत्तर देतील आणि त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात नाहीतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटणार आहेत, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.
भाजपने कितीही सूक्ष्म नियोजन करावे, कुस्तीचा एंड कोल्हापूरची जनता करेल
दरम्यान, संजय राऊत आणि शरद पवार यांनीही छत्रपती घराण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केला. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, प्रवीण दरेकर यांनी सारवासारव करू नये. जी चूक झाली, त्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगावी. त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे त्यांच्या नेत्यांनी शोधावं…भाजपने कसेही मायक्रोप्लानिंग करू दे. मात्र कोल्हापूरची जनता मायक्रो प्लॅनिंग करेल, त्यांना भीक घालणार नाही, सुरूवात त्यांनी केली, त्याचा एंड कोल्हापूरची जनता करेल, असे सतेज पाटील म्हणाले.