• Sat. Sep 21st, 2024

तेलंगणातील पराभवाच्या झळा महाराष्ट्रात, अहमदनगर बीआरएसला गळती, मोठी नेता काँग्रेसमध्ये

तेलंगणातील पराभवाच्या झळा महाराष्ट्रात, अहमदनगर बीआरएसला गळती, मोठी नेता काँग्रेसमध्ये

अहमदनगर: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचा झांजावात गेल्यावर्षी महाराष्ट्रात आला होता. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षातील मोठे नेतेही बीआरएसमध्ये दाखल झाले. मात्र, अलीकडेच तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही या पक्षाची हवा गेली आहे. आता तिकडे गेलेले नेत पुन्हा परतू लागले आहेत, तर काहींनी नवीन पक्षात प्रवेश करायला सुरवात केली आहे. बीआरएसच्या राज्य सुकाणू समितीचे सदस्य नगरमधील नेते घनश्याम शेलार यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेलार यांनी पक्षात प्रवेश केला.

शेलार यांनी बीआरएसतर्फे लोकसभा निवडणूक लढवावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. १० एप्रिलला आपण भूमिका स्पष्ट करू असे शेलार यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी त्याच दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे काँग्रेसतर्फे मेळावा आयोजित केला होता. त्यामध्येच शेलार यांनी पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्यात शेलार यांच्या रुपाने काँग्रेसला पुन्हा नेता मिळाला आहे. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल.
दानवे विरुद्ध काँग्रेसचा बडा नेता, जालन्यात २००९ सारखी लढत, कल्याण काळे बदला घेणार?

कार्यकर्ता ते नेता, सर्वच पक्षांत प्रवास

घनश्याम शेलार यांचा राजकीय प्रवास बहुतांश पक्षांतून झाला आहे. उमेदीच्या काळात शेलार पत्रकार-छायाचित्रकार होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे काम त्यांनी सुरू केले. पुढे भाजपमध्ये संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बराच काळ ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. नगरचे राष्ट्रवादी भवन त्यांच्याच काळात झाले. पुढे उमेदवारीच्या कारणावरून त्यांचे पक्षासोबत मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

मागील विभानसभा निवडणुकीच्यावेळी ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. माजी आमदार राहूल जगताप यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शेलार यांना श्रीगोंदा विधानसभेची उमेदवारी दिली. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून शेलार यांचा थोडक्यात पराभव झाला. शेलार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद होते. मात्र, त्यानंतर त्यांना पक्षात पुन्हा संधी दिसली नाही, त्यामुळे नव्याने आलेल्या बीआरएसमध्ये त्यांनी प्रवेश केला. आता बीआरएसचीही हवा विरल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाचे वर्तुळ पूर्ण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed