• Sat. Sep 21st, 2024

ईदचा शीर खुरमा महागला; ड्रायफ्रूट्ससोबत दूधाचेही भाव वाढले, जाणून घ्या नवे दर

ईदचा शीर खुरमा महागला; ड्रायफ्रूट्ससोबत दूधाचेही भाव वाढले, जाणून घ्या नवे दर

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक : रमजान ईद आज साजरी होणार असून, त्यापूर्वीच दुधाचे भाव गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गायीचे दूध पाच रुपये तर म्हशीचे दूध २५ रुपयांनी वधारले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात गायीच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीच्या दुधाला शभर रुपयांपर्यंत दर मोजावे लागत आहेत.

सणासुदीच्या काळात इतर वस्तूंचे दर वाढत असतानाच आता नाशिककरांना दूध दरवाढीचाही सामना करावा लागत आहे. दूध बाजारात महाशिवरात्रीपासून दुधाच्या दरांत प्रतिलिटर दहा रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचे दूधही काही प्रमाणात आटले आहे. त्यामुळे दूध बाजारात दुधाची आवक कमी झाली असून, व्यावसायिकांनी दर वाढविले आहेत. शहरातील दूध बाजारात महाशिवरात्रीपासून दरांत वाढ नोंदविली गेली. त्यानंतर होळी आणि गुढीपाडव्यासह, रमजान ईदमुळे दरांत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.

कोल्हापूरला येऊन खतरनाक वाटतंय, इथली लोक प्रेमळ; हास्यजत्रेची टीम गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत

आज, गुरुवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. यानिमित्त दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, ऐन सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढल्याने उत्सव साजरे करताना सर्वसामान्यांना महागाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. दूध बाजारात गायीचे दूध ४५ रुपये प्रतिलिटरवरून ५० रुपयांवर तर म्हशीचे दूध ७० ते ७५ रुपयांवरून १०० रुपये झाल्याची माहिती दूध विक्रेत्यांनी दिली.

उन्हाचा चटका जाणवू लागल्याने जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी दुधाची आवकही कमी झाली आहे. गुढीपाडवा, बोहरी समाज बांधवांची ईद, रमजान ईद यानिमित्त मागणी वाढल्यानेही दुधाचे भाव वाढले आहेत.- हाजी तौफिक शेख, दूध विक्रेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed