मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका असून या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केली आहे.मंगळवारी रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून नाना पटोले हे त्यांच्या राहत्या गावी सुकळी येथे जात होते. परंतु भिलेवाडा जवळ त्यांच्या कारला मागून ट्रकने धडक दिली. या अपघातात नाना पटोले यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने नाना पटोले अपघातातून थोडक्यात बचावले. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? असे ट्विट खुद्द नाना पटोले यांनी केल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याने काँग्रेसने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
Nana Patole Accident: नाना पटोलेंच्या गाडीला भीषण अपघात, वाहनाला ट्रकची जोरदार धडक अन्…नाना पटोलेंच्या अपघाताची चौकशी करा
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे ९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीचा भंडारा जिल्ह्यातील प्रचार संपवून साकोली गावाकडे गाडीने जात असताना त्यांच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आहेत त्यामुळे या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन सदर घटनेची सर्वंकष चौकशी करावी.
प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी
लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी नाना पटोले यांना राज्यभर दौरे करावे लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील घटना पाहता भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये याची खबरदारी घेत नाना पटोले यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.