• Mon. Nov 25th, 2024
    छोटी विमाने व हेलिकॉप्टर प्रचार मोहिमांमध्ये दंग, १० एप्रिलनंतर मागणी वाढण्याची शक्यता

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : देशात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून, त्यापैकी पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार असल्याने राज्यातील बहुतांश कंपन्यांची छोटी विमाने व हेलिकॉप्टर देशाच्या विविध भागांत प्रचार मोहिमांमध्ये दंग आहेत. महाराष्ट्रातही एकूण पाच टप्प्यांत मतदान होणार असल्याने १० एप्रिलनंतर राज्यात हेलिकॉप्टर व छोट्या विमानांची मागणी वाढेल, अशी आशा विमान कंपन्यांच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.निवडणुकीच्या कालावधीत राज्याच्या विविध दुर्गम भागात जलदगतीने पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात छोट्या विमानांना व हेलिकॉप्टरना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या राज्यात प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला नसल्याने राज्यातील विमाने व हेलिकॉप्टर इतर राज्यांत घिरट्या घालत आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार असून, सोमवारी त्याचे चित्र स्पष्ट झाले. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ठिकाणासाठी पहिल्या टप्प्यात विमानांचे बुकिंग झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी शिंदे गटाने व शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाने विमानांचे बुकिंग केले आहे. या दोन्ही पक्षांनी ४५ दिवसांचे बुकिंग केले आहे.

    बोटावर मतदानाची शाई नसल्यास परीक्षेस मनाई, या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे एनटीएचे आवाहन
    एका दिवसात अनेक प्रचारसभांमध्ये भाषणे करायची असतात. वेळ वाचवण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या विमानांना मागणी असते. अनेकदा विमानांची व हेलिकॉप्टरची संख्या कमी असते व नेत्यांकडून मागणी वाढत जाते. अशा वेळी विमाने न मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे अनेक पक्ष अगोदरच विमानांची बुकिंग करून ठेवतात. विदर्भात बुकिंग झाले असले तरीही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबईच्या भागात अद्याप एकाही कंपनीने बुकिंग केलेली नाही. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात मतदान असल्याने येथून फारसे बुकिंग होईल असे वाटत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    असे आहेत हेलिकॉप्टरचे दर

    – तीन तासांसाठी ४ लाख रुपये

    – त्यानंतर प्रतितास ३ लाख रुपये अतिरिक्त भाडे

    विमानापेक्षा हेलिकॉप्टरना मागणी

    विमानाला उतरण्यासाठी धावपट्टी लागते. मात्र, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी फारसा खर्च येत नाही. ते कुठेही मोकळ्या जागेत उतरवता येते. प्रचारासाठी स्टार प्रचारकांकडून हेलिकॉप्टरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरांमध्येही फरक असला तरी प्रचारक हलिकॉप्टरलाच पसंती देत आहेत.

    मोदींची सभा

    नाशिक किंवा दिंडोरी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवरही याबाबत हालचाली सुरू आहेत. या दरम्यान मोदी वगळता इतर लोकांना हेलिकॉप्टर लागू शकते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed