• Mon. Nov 25th, 2024
    निवडणुकीला उभे राहणं छगन भुजबळांचा धंदा, मनोज जरांगेंची घणाघाती टीका

    शुभम बोडके, नाशिकः राज्यभर ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद सुरू असून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा समाजाची मोट बांधत लढा दिला. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देऊ नये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच आहे.छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडणार, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेतून उमेदवारी महायुतीने देऊ नये, अशी भूमिका घेतली. मात्र आज मनोज जरांगे पाटील हे नाशिकच्या सिन्नर येथे दौऱ्यावर असताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर बोलत असताना भुजबळांना गंभीर इशारा दिला. नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांवर जरांगे पाटील हे अपक्ष मराठा उमेदवार देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
    प्रणिती शिंदेंविरोधात तक्रार दाखल; जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश, वाचा नेमकं प्रकरण
    मात्र छगन भुजबळ हे उमेदवारी लढवणार असल्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या चर्चेनंतर नाशिकमधून अपक्ष सकल मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याचे देखील घोषित केले होते. मात्र आज जरांगे पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना नाशिक लोकसभेसाठी आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही. अपक्ष नाही आणि कोणताच नाही. आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही, असे म्हणत उमेदवारी न देण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला. मात्र राजकारण आपला मार्ग नाही. राजकारणामध्ये मराठा समाजाचे आरक्षण मागे राहून राजकारण पुढे येईल. आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणे गरजेचे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

    मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही तर ओपनच्या मतदारसंघात छगन भुजबळ यांनी लढण्याचं काय काम, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. कॅनडा किंवा फ्रान्स या ठिकाणी जाऊन त्यांनी उभं राहावं, असा टोला देखील जरांगेंनी भुजबळ यांना लगावला. छगन भुजबळ यांना दिल्लीतून पाठिंबा यावर भुजबळ यांना अमेरिकेतून काय कुठून पण पाठिंबा येऊ द्या, त्याचं मला काय करायचं. मराठ्यांनी शंभर टक्के आरक्षण घ्यायचं, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा आहे. स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा असल्याची टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. आमच्या ओबीसी नोंदी सापडल्या भुजबळ किती दिवस खोटं बोलणार? 57 लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. भुजबळ विरोध करत रहा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेऊन दाखवणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिला.

    लावरे तो व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे ओरिजनल, आता ते कोणत्या तरी दबावा खाली आहेत | बाळासाहेब थोरात

    मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेवर आता छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला असून आता पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील हे लढत राहणार, अशी भूमिका यावेळी जरांगे पाटलांची पाहायला मिळाली. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास सकल मराठा समाज उमेदवार उभा करणार नाही. कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या उमेदवारीनंतर सकल मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed