विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ मुलचेरा, अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा येथे प्रचार सभेचा धडाका लावला. या सभांसाठी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड्यालवार, आरपीआय नेते रोहिदास राऊत, शरद पवार गटाचे अतुल गण्यार पवार तथा महाविकास आघाडी व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव काँग्रेस देणार, तरुणांना रोजगार देणार, आदिवासींना आपल्या जमिनीचा हक्क काँग्रेस मिळवून देईल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. देशाची लूट करणाऱ्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी हाच एकमेव पर्याय असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्रातील आदिवासी समाज असो किंवा बंगाली समाज असो या प्रत्येक समाजाला समान वागणूक ही काँग्रेसने दिली. आदिवासी समाजाला वन हक्काचे पट्टे देण्याचे काम काँग्रेस काळातच झाले. या परिसराततील सुरजागडला तीनशे हेक्टर जमीन मिळाली तर चेन्ना प्रकल्पाला का नाही..? असे विविध प्रश्न यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केले. या लोकसभा क्षेत्राचे भाजपचे गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेले अशोक नेते ज्यांनी समस्या तर सोडा मतदारांना आजवर तोंड दाखवले नाही. पण आता मात्र जनतेला भेटणारा त्यांचा समस्या सोडविणारा खासदार म्हणजे डॉ किरसान तुमच्यासाठी काम करणार, म्हणूनच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिंकून द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.