• Mon. Nov 25th, 2024

    मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल

    ByMH LIVE NEWS

    Apr 8, 2024
    मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल

    नाशिक, दि. ८ (जिमाका):  मतदान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप (SVEEP) च्या मुख्य नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज केले.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वीप अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहरातील होरायझन अकॅडमीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

    यावेळी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोल यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी तथा होरायझन अकादमीचे शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्यात आली. प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या या अधिकाराचा वापर करावा व दि. 20 मे रोजी मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    या कार्यक्रमादरम्यानअकादमीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे कार्यक्रम सादर करून मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश दिला. तसेच, विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed