• Sat. Sep 21st, 2024

रेशनच्या साड्या साभार परत, जव्हार तहसील कार्यालयासमोर शेकडो महिलांचा निषेध

रेशनच्या साड्या साभार परत, जव्हार तहसील कार्यालयासमोर शेकडो महिलांचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, पालघर/जव्हार : अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना धान्यासोबत एक साडी आणि बाजार करण्यासाठी पिशवी देण्यात आली आहे. या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. मात्र या साड्या आणि पिशवी परत करण्याचा निर्धार करून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील महिलांनी ३ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर धडक दिली. कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या महिला प्रातिनिधिक स्वरूपात १०० साड्या आणि ७२ पिशव्या परत करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचल्या. मात्र, तिथे तहसीलदार उपस्थित नसल्याने तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांकडे महिलांनी आपली भूमिका मांडणारे पत्रक दिले.

‘रेशनिंगद्वारे अशाप्रकारे साड्या, पिशव्या देणे म्हणजे योजनांची अंमलबजावणी फोल ठरल्याचे द्योतक आहे. अशा मोफत साड्या देण्यापेक्षा त्या साड्या खरेदी करण्यासाठी महिलांना सक्षम करणे, हा सरकारचा उद्देश असायला हवा. मात्र, तसा उद्देश दिसत नाही,’अशी टीका आंदोलनासाठी पुढाकार घेणारे कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो यांनी केली. ‘सरकारच्या आहेत त्या योजना नीट अंमलात आणून, विकास लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना साड्या वाटून आणि मोदींचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप करणे म्हणजे लोकांची फसवणूक असून त्यांच्यावर अन्याय आहे,’ असेही ते म्हणाले. अशाच प्रकारचे आंदोलन आज, ८ एप्रिलला डहाणू आणि विक्रमगड तालुक्यांतही केले जाणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
बांगलादेशात ‘इंडिया आऊट’ मोहीम, असं काय घडलं ढाक्यात? नेमकं षडयंत्र कुणाचं? जाणून घ्या
हे आंदोलन कोणत्याही संघटनेने केलेले नाही. गावातल्या काही महिलांनी येऊन सरकारच्या योजनेंतर्गत आम्ही वाटप केलेल्या साड्या आणि पिशव्या परत केल्या. हे वाटप करून आमचा काही विकास होणार नाही, असे निवेदन आम्हाला दिले आहे. ते निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत. – गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed