“महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार जर निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना असेल आणि आघाडीच्या सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींसाठी असेल. सुनेत्रा पवार यांना दिलेले मत नरेंद्र मोदींना जाईल तर सुप्रिया सुळे यांना दिलेले मत राहुल गांधी यांना जाईल. एवढे स्पष्ट सांगूनही काही लोकांना समजून घ्यायचं नसेल तर आम्ही काही करू शकत नाही”, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची सावध चाल
काहीही करून बारामतीत पवारांना हरविणे हाच भाजपचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अजेंडा आहे. जो अजेंडा भाजप आजपर्यंत स्पष्ट करत नव्हते पण चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने त्यांचा पोटातील अजेंडा ओठावर आला आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांवर तोंडसुख घेतले होते. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर बारामतीत आणि मतदारसंघात देखील संतप्त भावना होत्या. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना देखील चंद्रकांत पाटील यांचे विधान खटकले होते. चंद्रकांत पाटील यांच्या थेट विधानाचे मतरूपी परिणाम होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील लढाई पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध भाजप न ठेवता ती थेट नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करून सावध चाल खेळली आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
बारामती लोकसभेत मला आणि माझ्या भाजप कार्यकर्त्यांना अनेक वर्षांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवार यांचा पराभव करणे, हेच आमचे लक्ष्य असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात. सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. विशेष म्हणजे पवार यांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरविलेल्या रुपाली चाकणकर या शेजारी बसलेल्या असताना चंद्रकांत पाटील यांनी वरील विधान केले.