• Sat. Sep 21st, 2024

कॅटरिंग व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण, लग्नकार्यांसोबत निवडणुकांमुळे डबल धमाका

कॅटरिंग व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण, लग्नकार्यांसोबत निवडणुकांमुळे डबल धमाका

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीमुळे कॅटरिंग व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. लग्नकार्य, हिंदू नववर्षानिमित्त होणारे गृहप्रवेश आणि इतर लहान-मोठे कार्यक्रम यांना जोड म्हणून निवडणूक आली आहे. यामुळे कॅटरिंग व्यवसायासाठी सध्या डबल धमाका आहे.सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. सभा, रॅली सुरू आहेत. पारिवारिक मिलन होताहेत. वेगवेगळ्या कम्युनिटींना एकत्र आणत त्यांचे स्नेहभोज सुरू आहेत. अगदी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने भोजनावळी उठताहेत. उमेदवारांमध्ये एक प्रकारे चढाओढ लागल्यासारखे वातावरण आहे. प्र्रेमाचा मार्ग हा पोटातून जात असतो म्हणतात. खाल्लेल्या मिठाला जागावे अशी शिकवण आपल्याला अगदी लहानपणापासून देण्यात येते. त्यामुळे आपण ज्याचे अन्न खातो त्याच्याशी सहसा बेइमानी करत नाही.

बडे ‘सट्टाकिंग’ मोकाट, छोट्या बुकिंचीच धरपकड, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लोकांच्या मानसिकतेचा विचार करून उमेदवारांद्वारे मोठ्या प्रमाणात मतदारांसाठी भोजन सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. त्यातल्या त्यात लवकरच गुढीपाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमी आहे. या सर्व सण-उत्सवांचा विचार करत राजकीय पक्षांनी भोजनदान, स्नेहभोज, महाप्रसाद वितरणाचे आयोजन केले आहे. याचा फायदा शहरातील कॅटरिंग व्यावसायिक, आचारी यांना होत आहे. सण-उत्सवाला निवडणुकीमुळे वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. त्यातून कॅटरिंग व्यवसाय लाखोंची उलाढाल अनुभवत आहे. शहरात आजघडीला लहान-मोठे असे ५००च्या आसपास कॅटरर्स आणि आचारी आहेत. यापैकी बहुतांश व्यावसायिक निवडणुकीनिमित्त होणारे भोजन सोहळे, लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यस्त असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed