तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या वाढली आहे. फेब्रुवारीत तालुक्यात १५ टँकर सुरू होते. मात्र, महिनाभरात टँकरची संख्या २९ वर गेली असून, २४ गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. नदी, नाले, ओहोळ या अगोदरच कोरडेठाक पडले आहेत. आता लहान बंधारे, धरणेही कोरडी झाली आहेत. अशा स्थितीत वाड्यावस्त्यांना केवळ विहिरींचा आधार उरला होता. आता तो ही संपुष्टात येऊ लागला आहे. नागरिकांसह जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या गावांना टँकरने पाणी
गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड, डोंगरगाव, सांगवी, वराळे, दहीवड, वाखारी, तीसगाव, शेरी, कणकापूर, पिंपळगाव, गुंजाळनगर, वाखारी आदी गावे व वाड्यांची भर पडली आहे.
किशोरसागर धरण आटले
तालुक्यात गतवर्षी ८०० मिमी पाऊस पडला होता. यंदा ३०५ मिमी पाऊस झाला. गतवर्षाच्या तुलनेत ४९५ मिमी अत्यल्प पावसाने व पूरपाण्याने उजव्या वाढीव कालव्यावरील किशोरसागर धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, सध्या किशोरसागर पूर्णपणे आटले असून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
मागणीनुसार पाणीपुरवठा सुरळीत आहे. पुढील काळात भासणाऱ्या पाणी टंचाईसाठी किशोरसागर धरणासाठी चणकापूर धरणातून १५ मे रोजी २३१ दलघफू पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे.- डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, देवळा