• Mon. Nov 25th, 2024

    विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

    ByMH LIVE NEWS

    Apr 7, 2024
    विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

    सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची सन 1980 ते 2019 पर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय  आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथील सभागृहात झाले.

    यावेळी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे निवडला अधकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

    विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तके चे कौतुक करून ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या पुस्तिकेमध्ये लोकसभा निवडणूक सन 1980 ते 2019 पर्यंतच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच सर्व निवडणूक संबंधी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक तसेच निवडणुक संबंधी स्थापन करण्यात आलेल्या संबंधित कक्षाचे सर्व नोडल अधिकारी यांचे संपर्क क्रमांक ही यामध्ये देण्यात आलेले असल्याने ही पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले.

    संदर्भ पुस्तिका :

    भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणारा असून दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यम कक्षाच्या वतीने सन 1980 ते 2019 पर्यंत ची उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारी सह अन्य निवडणूक संबंधी माहिती देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे.

    यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक, लोकसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त नोडल अधिकारी यांची यादी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, निवडणूक आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पेड न्यूज, सोशल मीडिया सह राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रामाणिकरण, सोशल मीडियासह इंटरनेटवरील मजकुराशी संबंधित आदर्श आचारसंहिता, मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे, निवडणूक विषयक वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशन्स आदीची माहिती देण्यात आलेली आहे.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed