राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठ जेईई मेन व त्यानंतर जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. दरवर्षी ‘एनटीए’मार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा जानेवारी महिन्यात या परीक्षेचे पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राची परीक्षा चार एप्रिलपासून सुरू झाली असून, १२ तारखेपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. चार, पाच, सहा, आठ आणि नऊ या तारखांना बीई व बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर एक असून, आर्किटेक्चर, प्लॅनिंग या दोन विषयांच्या प्रवेशासाठी १२ एप्रिलला पेपर २ असणार आहे.
देशभरातील ज्या ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा सुरू असून, नाशिक शहरातील सहा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज १ हजार ७०० विद्यार्थी या सहा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. एकूण जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १२ एप्रिलला ही परीक्षा संपणार असून, ३० एप्रिलपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
जेईई अॅडव्हानस्ड् २६ मे ला
जेईई मेनच्या या सत्रात व पहिल्या सत्रात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षा द्यावी लागणार आहे. जेईई मेनचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयआयटी मद्रासमार्फत जेईई अॅडव्हान्सड् ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जेईई मेन मधील अडीच लाख गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्सला बसता येणार आहे.