• Mon. Nov 25th, 2024

    शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलं; पदाचा गैरवापर करत लाखोंचं अनुदान मिळवलं, शेतकरी नेत्याचे गंभीर आरोप

    शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलं; पदाचा गैरवापर करत लाखोंचं अनुदान मिळवलं, शेतकरी नेत्याचे गंभीर आरोप

    मोबीन खान, शिर्डी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या संस्थेला लाखो रुपयांचं अनुदान मिळवून दिल्याचा आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी लोखंडेंची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकी आधीच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड आणि अन्य संस्थांकडे असलेला निधी आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत. असे बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग, इडी सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करुन नियम डावलून अनुदान मिळवणाऱ्या व्यक्ती आणि वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी केली.
    ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल
    खा.सदाशिव लोखंडे यांच्या अधिपत्याखालील खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्यूसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई या संस्थेच्या संचालक पदी त्यांच्या एकाच कुटुंबातील पाच जण संचालक आहेत. पत्नी – नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा – प्रशांत सदाशिव लोखंडे, सून – प्रियांका प्रशांत लोखंडे, मुलगा – राज सदाशिव लोखंडे, सून – अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपदी कुटुंबातीलच १० जण आहेत.

    संचालक पदावर एका कुटुंबातील दोन व्यक्तीदेखील असू नयेत असा नियम असताना, नियमांना बगल देत या कंपनीला केंद्र शासनाचे ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज दिले. त्यापैकी १६ कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे, जे बेकायदेशीर आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज आणि अनुदान नाकारले जाते.

    लोखंडे यांनी हे अनुदान केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत मिळवलेले आहे. या योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. जागतिक बँक, नाबार्ड, NabKisan, स्मार्ट, पोकरा, या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे दिले जाते. जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झालेला असूनही त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
    भाजपच्या शिलेदारांचा कोल्हेंना रामराम, माजी उपनगराध्यक्ष – नगरसेविकेचा अजितदादा गटात प्रवेश
    स्वतः खासदार पदावर असताना केंद्र शासनाच्या एखाद्या योजनेचा अशा गैरप्रकारांनी, नियमांना बगल देत, यंत्रणेवर दबाव आणून, स्वतःच्या फायद्यासाठी निधी मिळवला आहे. हे प्रकरण सरळ सरळ पदाचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचा आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे.

    या कंपनीला दिलेले अनुदान व्याजासह वसूल करण्यात यावे, या पैशाचा वापर करून अन्य मालमत्ता विकत घेतल्या असतील, तर त्याची ईडीकडून चौकशी करण्यात यावी, मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंडची वसुली करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते घनवट यांनी केली आहे.

    मी १० वर्षांत काय केलं हे दाखवून देईन, जनता पुन्हा निवडून देईल; सदाशिव लोखंडेंना विश्वास

    ‘कोणतीही चौकशी करा मी तयार’
    कोणतीही चौकशी करा मला अडचण नाही. कुणाला काय कागद पाहिजे ती द्यायची माझी तयारी असून आम्ही घेतलेले कर्ज भारत सरकारच्या ऑपरेशन ग्रीन मधील आहे. या कांद्याच्या प्रकल्पाला मान्यता आहे. सर्व बाबी रितसर आहेत. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed