महाविकास आघाडीत पवारांच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात स्वतःकडे एकनाथ खडसेंसारखा नेता असला तरी शरद पवारांची मोठी अडचण झाली. कारण, खडसे सध्या वेगळ्याच अडचणीत आहेत आणि पवारांसमोर पेच निर्माण झाला तो रक्षा खडसेंना आव्हान देण्यासाठी तोडीस तोड उमेदवार कोण द्यायचा.
रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी, मात्र भाजपचाच एक गट नाराज आहे. भाजपचे दिवंगत माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हे प्रचारापासून दूर आहेत. नाराजी असल्यामुळे जावळे समर्थकांची वेगळी चूल मांडण्याची भूमिका असून अमोल जावळे हे रोहित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. अमोल जावळेंना पक्षात आणून रावेरमधून उतरवण्याची जबाबदारी रोहित पवारांवर आहे.
दिवंगत हरीभाऊ जावळे हे १९९९ ला आमदार, २००७ च्या पोटनिवडणुकीत खासदार आणि २००९ ला रावेरमधून दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले. २०१४ लाही हरीभाऊ जावळेंना तिकीट जाहीर झालं, मात्र खडसेंच्या आग्रहामुळे हे तिकीट रक्षा खडसेंना देण्यात आलं. त्यानंतर हरीभाऊ जावळे रावेरमधून विधानसभेवर निवडून गेले. २०१९ ला जावळेंचा पराभव झाला, करोनामध्ये निधन झालं. मात्र अमोल जावळे राजकारणात सक्रिय आहेत.
अमोल जावळे रक्षा खडसेंच्या विरोधात लढल्यास भाजपच्या मतांमध्ये मोठी विभागणी निश्चित आहे. भाजपचीच मतं विभागली गेली तर अमोल जावळे यांचं पारडं जड होईल. खडसे काही दिवसात भाजपात येण्याची शक्यता आहे, पण अमोल जावळे आता पवारांच्या संपर्कात असून उच्चशिक्षित आणि नवीन चेहरा असल्यामुळे अमोल जावळे यांच्या नावाची कार्यकर्त्यांमधून मागणी आहे.
मुक्ताईनगरमधून २०१९ च्या विधानसभेला एकनाथ खडसेंना डावलून त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आलं, पण अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामागे अदृश्य शक्ती उभा राहिली आणि खडसेंच्या हातून त्यांचा पारंपरिक मतदारसंघही गेला. या लोकसभा निवडणुकीतही अमोल जावळे पवार गटात गेले आणि त्यांच्या मागे अदृश्य शक्ती उभा राहिली तर रक्षा खडसेंच्या अडचणी वाढतील असं कार्यकर्ते खाजगीत बोलताना सांगतात. पक्षाचा आदेश आल्यानंतर कार्यकर्ते अधिकृत उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभा करतील, पण अमोल जावळेंसारखा भाजप निष्ठावंत पवारांकडे गेल्यास खडसे कुटुंबाची पुन्हा एकदा राजकीय कोंडी होईल असं चित्र रावेरमध्ये तयार झालं आहे.