त्याच अनुषंगाने महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी आणि विजयभाऊ औटी मित्रपरिवाराची कामोठ्यातील ताकद दाखवण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता, नालंदा बुद्ध विहार मैदान, सेक्टर ११, कामोठे येथे भव्य पारनेरकर परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
२०१९ साली पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार निलेश लंके यांनी इतिहासात पहिल्यांदा पारनेरच्या विधानसभेचे रणशिंग कामोठे येथून फुंकले होते. नोकरी, व्यवसायानिमित्त राहणाऱ्या आणि निर्णायक मतदान देणाऱ्या गावाकडच्या माणसांना कायम मदतीचा हात देणाऱ्या पारनेरकर वासीयांच्या जिवावर आणि त्यांच्या एकजुटीचा राजकारणात शिताफीने केलेला वापर, महिला भगिनींना मेळावे घेऊन घातलेली भावनिक साद यामुळे निलेश लंके यांनी तालुक्यात वातावरण तयार केले.
घराघरात आणि गावोगावत मुंबई स्थित पारनेरकरांनी निलेश लंके यांच्यासाठी जीवाचे रान केले आणि त्यांना आमदार केले. पण आमचा राजकीय वापर झाल्याचा आरोप विजूभाऊ औटी मित्र परिवाराने केला आहे. म्हणूनच सुजय विखेंना ताकद देण्यासाठी या मेळाव्याचं अयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती विजुभाऊ मित्र मंडाळाकडून देण्यात आली.
आज मुंबई स्थित पारनेरकर परिवाराचा झालेला राजकीय वापर, त्यांची वेळोवेळी केलेली मानहानी, त्यांच्या दुखावलेल्या भावना, आमदारकीला विजयी करणाऱ्या मुंबई स्थित पारनेरवासियांना झालेला शून्य फायदा, आमदार झाल्यानंतर बदलले रंग यामुळे सर्व मुंबईस्थित पारनेरकरांनी त्याच्या पराभवाचा चंग बांधला आहे.
विजय औटी यांनी राजकारणात झालेली मानहानी राजकारणातूनच दूर करायच्या हेतूने युवकांचे मोठे संघटन पारनेर तालुक्यात उभे केले. एके काळी निलेश लंके यांच्यासाठी जीव ओवाळून टाकला, त्यांना ताकद दिली, त्यांना नगराध्यक्ष केलं. पण आता विजय सदाशिव औटी यांना ताकद देऊन आज कामोठ्यातूनच लंकेच्या गडाला सुरुंग लावण्याचा निश्चय विजुभाऊ औटी मित्र परिवाराने घेतला आहे. याच अनुषंगाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे असं विजुभाऊ यांनी सांगितलं.
तसेच या मेळाव्यासाठी हत्ती, घोडे, उंट यांच्या साथीने खासदार सुजय विखे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची राजेशाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते परमेश माळी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. कामोठे नगरीमध्ये सर्व पारनेरकर बांधवांना एकवटण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष मदत करत आहेत. विजुभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन या परिवार संवाद मेळाव्याचे आयोजक आहेत. त्यांच्या वतीने सर्व पारनेरकर वासियांना या मेळाव्याला सहकुटूंब उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.