• Sat. Sep 21st, 2024

भारतरत्न पुरस्कराची खैरात वाटली जातेय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांची टीका

भारतरत्न पुरस्कराची खैरात वाटली जातेय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कार्यकर्त्यांच्या कार्याला बळ मिळावे यासाठी आपल्याकडे पुरस्कार देण्याची प्रथा आहे. हे पुरस्कार त्या कार्यकर्त्याच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात. पुरस्कारप्राप्त कार्यकर्ता अधिक जोमाने कामाला लागतो. पूर्वी पद्म किंवा भारतरत्न पुरस्कार मिळाला म्हणजे खूप महत्त्वाची बाब होती. आता मात्र पद्म पुरस्कार तर सोडाच, परंतु भारतरत्न पुरस्कारांचीही खैरात वाटली जाते, अशी टीका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांनी केली.

कालिदास कलामंदिर येथे शुक्रवार (दि. ५) आयोजित केलेल्या गिरणा गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, अनेकांच्या कामाची कदर केली जात नाही. जो काम करीत नाही त्याला पुरस्कार दिले जातात. मात्र, जो काम करतो त्याला सहसा पुरस्कार मिळत नाही. त्यामुळे गिरणा गौरव पुरस्कार सच्चा कार्यकर्त्यांना दिला जातो आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. पद्म पुरस्काराबद्दल काकासाहेब कालेकरांचे एक महत्त्वाचे वाक्य आहे. ‘जो जो सरकारी होता है, वो असरकारी होता है’ बिन सरकारी पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे. सरकारी पुरस्कारांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही. त्यामुळे गिरणा गौरव पुरस्काराला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. एअरफोर्सचे एक ब्रीदवाक्य आहे, ‘टच द स्काय’, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे तरच यश मिळते, असे ते म्हणाले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, अनेकदा मी कुठून सुरुवात करू, असा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, दामोदर मावजो यांचे बंधू हनुमंत मावजो यांच्याकडे पाहिले तर त्यांनी आपली पहिली कविता ही वयाच्या सत्तराव्या वर्षी केली. त्यामुळे ठराविक एका वयात सुरुवात केली म्हणजे यश मिळते असे नाही. तुम्ही कधीही सुरुवात करा, यश मिळेलच यात शंका नाही.
भुजबळांनी एका फटक्यात भरले साडेसहा कोटी! २०११चं कर्जप्रकरण, लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा
यांना मिळाला पुरस्कार

यावेळी गिरणा गौरव पुरस्काराचे प्रमुख सुरेश पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, आमदार देवयानी फरांदे, योगेश सोनवणे, प्रशांत पाटील, रवींद्र मालुंजकर, डॉ. विलास बच्छाव, अविनाश धनाईत, प्रशांत खरोटे, भूषण पगार, विकास नवाळे, किरण वाघ, किशोर खैरनार यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed