• Mon. Nov 25th, 2024
    एकाच दिवसात हत्या; कोल्हापूरात फिल्मी स्टाईलनं तरुणाला संपवलं, रंकाळा तलावावरील घटना

    कोल्हापूर: शहर आज ३ खुनाच्या घटनांनी हादरून गेला आहे. सकाळपासूनच कोल्हापुरातील विविध भागात तीन विविध कारणांमुळे खून झाल्याची घटना समोर आली असून यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यात एका पुरुषाचा शीर नसलेला सडलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तर दुपारच्या सुमारास एका तरुणीला आई आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. तर दिवसभरातील तिसरी घटना ही कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलाव येथे घडली आहे. रंकाळा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला असून खून करून मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. दिवसभरातील या ३ खुनाच्या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे.शीर नसलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला
    कोल्हापूर शहरात आज सकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागे असलेल्या ओढ्यात शीर नसलेला सडलेला मृतदेह आढळून आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नालेसफाईचे काम सुरू असून सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये आज सकाळी महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने नालेसफाईचे काम कर्मचारी करत होते. यावेळी कर्मचाऱ्यांना नाल्यात पुरुषाचा सडलेला मृत्यू दिसून आला.
    मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात पहिला अपघात; उद्घाटनानंतर काही दिवसांतच घटना
    यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. मृतदेह सढलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्वरित मृतदेहाचे शीर शोधण्यास सुरू केलं असून मृतदेहाचे शीर नसल्याने घातपाताची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    आई आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने तरुणीचा मृत्यू
    तर दुपारच्या सुमारास दुसरी घटना समोर आली असून यामध्ये शनिवार पेठेतील शनिवार पोस्ट ऑफिसजवळ राहणारी वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (२४) हिचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा आढळून आल्याने तिचा मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला, असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला करत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार, वैष्णवी पवार ही एका खाजगी बँकेत नोकरी करत होती. ती तिची आई आणि भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती.

    आज सकाळी तिला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. यावेळी तिच्या अंगावर मारहाणीचे खुणा दिसत होत्या. दरम्यान तिच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आला. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंगावर मारहाणीच्या खुना दिसत असल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृत वैष्णवी हिची आई शुभांगी लक्ष्मीकांत पोवार (५०) आणि भाऊ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

    माझा अपमान गिळून मी अजूनही दोस्तीचा हात पुढे केलाय; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना साद

    रंकाळा येथे एकाची हत्या
    तर शहरातील तिसरी घटना ही टोळी युद्धातून सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहराचं वैभव असलेल्या रंकाळा तलाव परिसरात रंकाळा टॉवर येथे शेकडो पर्यटकांच्या समोर खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यादव नगर येथे राहणारा अजय शिंदे (३०) हा तरुण आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसोबत रंकाळा टॉवर परिसरात आला होता. यावेळी संध्याकाळी ६ च्या सुमारास अज्ञात चार ते पाच मारेकर्‍यांनी धारदार शस्त्र हातात घेत अजय शिंदे यांचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अजय शिंदे यांच्या डोक्यात आणि तोंडावर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले.

    या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. एका दिवसात तीन खुनांच्या घटनांनी कोल्हापूर शहर हादरून गेले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. भर दिवसा शहरात विविध ठिकाणी अशा पद्धतीने खून होत असल्याने पोलिसांच वचप राहिले आहे की नाही असे विचार ना सर्वसामान्यांमधून होऊ लागली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *