• Sat. Sep 21st, 2024

सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले

सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले

सातारा (संतोष शिराळे) : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये गतिमान हालचाली सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सकाळी सिल्व्हर ओक या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.या भेटीत दोघांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत तासभर चर्चा झाली. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नसताना नेमके पुरुषोत्तम जाधव हे शरद पवार यांना भेटल्याने वेगळाच राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. निवडणूक जाहीर होऊन १५ दिवसाचा कालावधी निघून गेला, तरी उमेदवार निश्चित न झाल्याने सस्पेन्स कायम राहिला आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी साताऱ्यात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांचे जनमतही जाणून घेतले. या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीची कारणे सांगून माघार घेतली असली, तरी या ठिकाणी त्यांच्याच नावाला पसंती मिळत आहे. या बैठकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावाची ही चर्चा झाली. यात शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांची नावे आघाडीवर होती. त्यावेळी त्यांनी उमेदवार जाहीर न करता एक-दोन दिवसात सर्व स्पष्ट होईल असे संकेत दिले होते, मात्र याला आठ दिवस ओलांडूनही काही निर्णय झाला नाही. अशातच उमेदवार निश्चितीसाठी शरद पवार यांनी मुंबई येथे बैठका सुरू ठेवल्या आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र, बहुचर्चेत असलेला सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्णय होऊ शकला नाही. या दोन्ही मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या वाढत्या यादीमुळे नाव निश्चितीसाठी विलंब होत असल्याचे माहिती समोर येत आहे. अशातच मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हालचाली गतीने वाढू लागल्या आहेत. नववर्षाच्या मुहूर्तावर माढा, साताऱ्याचा उमेदवार शरद पवार जाहीर करणार असल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरच उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून होत आहे. चार दिवसांपूर्वी कराड येथे पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनीही तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांचे आघाडीवर असलेले नाव मागे पडले आहे. काँग्रेससाठी राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला, तर आपण निवडणूक लढू, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राजकीय घडामोडी होऊन सध्या साताऱ्यासाठी पुन्हा श्रीनिवास पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सातारा लोकसभा उमेदवारीबाबत गेल्या दोन दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेली असतानाच आज एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मुंबई येथे सिल्व्हर ओके येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने एक नवीनच ट्विस्ट निर्माण झाला आहे. या ठिकाणी जाधव यांनी मागील दोन लोकसभा निवडणुकांत किती मते घेतली होती. याची माहिती पवार यांना दिली. तसेच महायुतीकडून त्यांना डावलले जात असल्याने त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरही लढण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, मी २००९ व २०१४ मध्ये सातारा लोकसभा लढलो आहे. ८३ वर्षांचा योद्धा शरद पवार हे कुस्तीवर प्रेम करणारे असून, मीही कुस्तीवर प्रेम करणारा आहे. २००९ मध्ये सेना-भाजपचा उमेदवार होतो. २०१४ मध्ये मी अपक्ष लढताना मला मोदींची लाट असताना मला देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. २०१९ मध्ये मला थांबविण्यात आले. सातारा जिल्हा विकासापासून वंचित असून, या व्यथा सोडविण्यासाठी निवडणूक लढली पाहिजे. मी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे मला उमेदवारी मिळेल. कोणी तरी मला नक्कीच उमेदवारी देईल, अशी आशा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे. आता खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता साताऱ्यात क्रांती करण्याची संधी मला शरद पवारच देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पुरुषोत्तम जाधव हे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून, त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढताना शिवसेनेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी तुतारीच हातात घ्यावी लागेल. पुरुषोत्तम जाधव यांचे महाआघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध असले तरी आयात उमेदवार म्हणून त्यांना राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांची किती साथ मिळेल हा देखील प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांच्याबाबत खासदार शरद पवार कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आता सातारा जिल्ह्यातील मतदारांसह विविध पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांना लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed