• Sat. Sep 21st, 2024
एपीएमसीत पिवळ्या धम्मक कलिंगडांची नवलाई, ग्राहकांकडून संमिश्र मागणी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ‘भैयाजी, तरबूज अंदरसे लाल है ना।’, अशी विचारणा करणारे ग्राहक आणि ‘हा हा लालही है। लाल नही निकले गा तो वापस देना,’ अशी छाती ठोकून गॅरेंटी देणारा विक्रेता आपण पाहतो. पण, वाशीच्या घाऊक बाजारात सध्या आतून लाल नव्हे, तर पिवळी असणारी कलिंगडे दाखल झाली आहेत. या कलिंगडांबाबत काहींच्या मनात शंका असून, काहींना याबाबत कुतूहलही वाटत आहे. त्यामुळे सध्यातरी या कलिंगडांना संमिश्र मागणी असल्याचे दिसून येत आहे.उन्हाळा असल्याने सध्या बाजारात कलिंगडांची आवक वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारामध्ये लाल कलिंगडांबरोबरच सध्या पिवळ्या कलिंगडांचीही आवक सुरू झाली आहे. ही कलिंगडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांना संमिश्र मागणी आहे. कारण ही कलिंगडे चांगली आहेत ना, असा पहिला प्रश्न ग्राहक विचारताना दिसत आहेत.

या कलिंगडांचे उत्पादन ठराविक कालावधीतच येत असल्याने केवळ तीन महिने ही कलिंगडे बाजारात पाहायला मिळतात. सध्या सोलापूरमधून या कलिंगडांची आवक सुरू आहे. ही कलिंगडे लाल कलिंगडांपेक्षा महाग आहेत. घाऊक बाजारातच या कलिंगडाचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एका कलिंगडासाठी जिथे ४० ते ५० रुपये मोजावे लागतात, तिथे या कलिंगडासाठी ७० ते ८० रुपये म्हणजे दुप्पट दर द्यावा लागत आहे. ही कलिंगडे चवीला अतिशय गोड आहेत.

सोलापुरातून आवक

बाजारात वर्षभर बाहेरून हिरवी आणि आतून लाल असणारी कलिंगडे येत असतात. या कलिंगडाच्या किमती घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये किलोच्या आत असतात. यामध्ये लांबट आकाराची आणि पांढरे पट्टे असणाऱ्या नामधारी कलिंगडांबरोबरच आकाराने गोल आणि हिरव्यागार असणाऱ्या शुगर किंग जातीच्या कलिंगडांचा समावेश होतो. या शुगर किंग कलिंगडाना मोठी मागणी असते. मात्र, यावेळेस या उन्हाळ्यात सोलापूरच्या आतून पिवळी असणारी कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. ही कलिंगडे सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, ग्राहकांमध्ये त्यांच्याबाबत थोडी साशंकताही आहे. तर काही ग्राहक जाणीवपूर्वक ही कलिंगडे घेऊन जात आहेत, अशी माहिती व्यापारी बजरंग कटके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed