• Mon. Nov 25th, 2024
    कपडे बाजारात मरगळ, टेक्सटाइल हब’ तिरुपूरमध्ये प्रचार साहित्याला केवळ दहा टक्केच मागणी

    टाइम्स वृत्त, तिरुपूर : प्रचारासाठी नेत्यांची छबी, पक्षांची चिन्हे छापलेल्या टीशर्ट, टोप्यांनी दर निवडणुकीत फुलून जाणाऱ्या तिरुपूरच्या बाजारपेठेत यंदा शांतता आहे.‘टेक्सटाइल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपूरमध्ये यंदा या प्रचारसाहित्याला तुरळकच मागणी आहे.पूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा टीशर्ट, टोप्या अशा साहित्याची मागणी जवळपास दहा टक्क्यांवर आल्याचे येथील उत्पादक सांगतात. पूर्वी निवडणुकीत उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली, की लगेच त्यांच्या छायाचित्रांचे आणि पक्षांच्या चिन्हांचे टीशर्ट, टोप्या यांची मागणी नोंदविण्यात येत असे. पूर्वी अशा दहा-वीस हजार कपड्यांची मागणी येत असे, पण यंदा हा व्यवसाय दहा टक्क्यांवर आल्याचे सांगण्यात आले. पूर्वी अण्णा द्रमुक, द्रमुक व तमीळनाडूतील पक्षांच्या वतीने वेगवेगळ्या घोषणा छापलेल्या कपड्यांना मोठी मागणी असे. यंदा फक्त भारतीय जनता पक्षाने असे कपडे मागविले असून, त्याचेही प्रमाण अत्यंत कमी आहे.
    ‘यूपीआय’द्वारे रोज पाच हजार तिकिटांची विक्री, एसटीच्या खात्यात इतक्या कोटींचा महसूल गोळा
    यामागे विविध कारणे सांगण्यात येत आहेत. प्रामुख्याने यंदा प्रचाराला कमी कालावधी मिळत आहे. निवडणुकीची घोषणा आणि मतदान यामध्ये केवळ महिन्याभराचे अंतर आहे; तसेच निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने खर्चमर्यादेच्या कचाट्यात सापडू नये, याची काळजी सगळेच घेत आहेत. त्याचाही परिणाम या मागणीवर झाला आहे. आयोगाकडून ठिकठिकाणी वाहनांचीही तपासणी करून अशा कपड्यांचे साठे जप्त होण्याची भीती राजकीय पक्षांना वाटते. गेल्या निवडणुकीत एका पक्षाने ३० हजार टी शर्टची मागणी नोंदविली होती, यंदा या पक्षांनी चौकशीही केलेली नाही, असे एका उत्पादकाने सांगितले. पूर्वी निवडणुका चुरशीने लढविल्या जात; परंतु यंदा द्रमुकला फारसा विरोध होणार नाही, असा विश्वास असल्याने ते फारसा खर्च करू इच्छित नाहीत, असे एका उत्पादकाचे मत आहे.

    पूर्वी देशभरातील विविध पक्षांकडून तिरुपूरमध्ये अशा कपड्यांसाठी मागण्या नोंदविल्या जात. मात्र, आता लुधियाना आणि मुंबईतील उत्पादकांनीही या क्षेत्रात जम बसविल्याची माहिती तिरुपूर एक्सपोर्टर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. पी. मुथुरत्मन यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed