उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी सर्वसामान्यांची लगबग सुरू आहे. रेल्वेसेवा नसलेल्या तालुका तसेच गाव-खेड्यात जाण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला प्रथम प्राधान्य आहे. यामुळे एसटी फेऱ्यांची वेळ, आरक्षण, गाडीची माहिती मिळवणे, गाडी किती वाजता पोहोचेल, यासाठी प्रवासी एसटीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधतात.
‘मुंबई सेंट्रलहून रात्री १०नंतर साताऱ्याला जाणारी शेवटची गाडी किती वाजता असेल, यासाठी टोल फ्री क्रमांकाशी संपर्काचा पाच वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही,’ असे भायखळा येथे राहणाऱ्या प्रवासी मीनाक्षी सावंत यांनी ‘मटा’ला सांगितले.
‘शयनयान श्रेणीची गाडी नेमकी कधी उपलब्ध असणार आहे, याची माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे नाइलाजाने खासगी गाडीतून प्रवास करावा लागत आहे,’ अशी प्रतिक्रिया मुंबई सेंट्रल परिसरातील स्थानिक किशोर पवार यांनी दिली.
हेल्पलाइन बंद असणे, योग्य माहिती न मिळणे, रात्री नऊनंतर प्रतिसाद न मिळणे अशा तक्रारी प्रवाशांच्या आहेत. याबाबत महामंडळाच्या सामान्य प्रशासन वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता, ‘हेल्पलाइनच्या मंजूर पाच लाइनपैकी चार सुरू आहेत. प्रवाशांच्या कोणत्याही तक्रारी महामंडळाकडे आलेल्या नाही. हेल्पलाइन सुरू आहे,’ असे सांगण्यात आले. माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी १८००-२२-१२५० हेल्पलाइन सुरू केली होती.
‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ रखडली
आपली एसटी कुठे पोहोचली, याची अॅपद्वारे लाइव्ह माहिती देण्यासाठी महामंडळाने सर्व गाड्यांमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ राबवण्याचा निर्णय घेतला. काही गााड्यांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करून चाचणी झाली. मात्र, सर्व गाड्यांत अद्याप यंत्रणा लागू झाली नसल्याने मोबाइल अॅपही रखडले. यामुळे गाड्यांची माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांना एसटी स्थानकातील नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.