जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चार मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार ज्यांनी आझ उन्मेष पाटलांसोबत शिवसेनेत प्रवेश घेतला त्यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना असा धक्का खाणारी नाही – उद्धव ठाकरे
“आश्चर्यकारक भूकंप होणार अशा बातम्या येत होता, तो आज सगळ्यांनी पाहिला. मी उन्मेष पाटील आणि कार्यकर्त्यांचं स्वागतच नाही तर अभिनंदन करतो. कारण आजपर्यंत कोणीही इकडे-तिकडे गेलं की शिवसेनेला धक्का असं मी वाचत होतं. असा धक्का खाणारी शिवसेना नाही, शिवसेना जेव्हा धक्का देते जेव्हा जोरदार देते. सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे त्यात बदल व्हावा, सत्ताबदल व्हावा त्यासाठी लढतोय”, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
“देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. यावेळी देशात जर पुन्हा एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला असं समजा. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची जी वृत्ती आहे, त्याविरोधात आम्ही लढलो. पण आता त्यांच्या पक्षातील जे निष्ठावान आहेत, ज्यांनी रक्त आटवून पक्ष बांधनी काम केलं त्यांनाही फेकून देण्याचं धोरण भाजपने अवलंबलं आहे. त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्या असंख्य साथीदारांसह पक्षात प्रेवश केला. ही खरी बंडखोरी”.
“जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. आजपर्यंत आम्ही तो मित्रपक्षाला सोडला होता. त्यामुळे गेल्यावेळी आम्हा दोघांचे उमेदवार उन्मेष पाटील होते. निवडून आल्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं. आम्हालाही असं वाटलं होतं की जळगाव आम्ही घेतोय पण उन्मेष तिथे असेल तर लढायचं कसं. पण, त्या कार्यकर्त्यावरच अन्याय झाला आहे. त्यांना काही हवंय म्हणून नाही तर त्यांना जे करायचं आहे ते भाजपमध्ये करु शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पक्ष चाललाय हे जाणवल्यानंतर ते शिवसेनेत आले. मी त्यांचं स्वागत करतो”, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई – अमोल कीर्तिकर
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
ठाणे – राजन विचारे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गिते
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
परभणी- संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
सांगली – चंद्रहार पाटील
मावळ – संजोग वाघेरे
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
कल्याण डोंबिवली – वैशाली दरेकर
हातकणंगले – सत्यजीत पाटील
पालघर – भारती कामडी
जळगाव – करण पवार