महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ स्थानिकांनी लावलेला एक फलक वादग्रस्त ठरला आहे. घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये, अशा सूचना लिहिलेला एक फलक सुळक्याच्या पायथ्याला लावण्यात आला आहे. येथे नियमित येणाऱ्या काही गिर्यारोहकांनी सोशल मीडियात नाराजी व्यक्त केल्याने याची चर्चा सुरू झाली. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हा फलक तेथे कोणी लावला, याचा उल्लेख नाही. मात्र, तो काही गावकऱ्यांनीच लावला असल्याचे सांगण्यात येते. या शिखरावर नेहमी येणारे अकोले तालुक्यातील गिर्यारोहक राहुल भांगरे यांनी ही गोष्ट सर्वांच्या निदर्शानास आणून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ते येथे आले असता त्यांना हा फलक दिसला. त्यांनी म्हटले आहे की, कळसुबाई ही स्त्रीशक्तीचे एक मोठे प्रतीक आहे. म्हणून नवरात्रात कळसुबाईच्या शिखरावर लक्षावधी लोक स्त्रीत्वाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जातात.
स्थानिक दंतकथेनुसार कळसुबाई ही एक अत्यंत स्वाभिमानी स्त्री होती जी तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध वागल्यामुळे ती घर सोडून थेट या शिखरावर जाऊन बसली. या शिखरावर अनेक वेळा आलो. आतापर्यंत तेथे नसलेला एक फलक नुकताच पाहण्यात आला. त्यावरील सूचना वाचून माझ्यासह मित्रांचा प्रचंड संताप झाला. एका स्त्रीच्या मंदिरातच विवाहित आणि पाळी आलेल्या स्त्रियांना प्रवेश बंदी आहे, हे पाहून संताप होणे स्वाभाविक होते.
ज्या गावाजवळ हे शिखर आहे, त्या बारी गावातील गावकऱ्यांनी पूर्वी शिखरावर एका पथांच्या देवाचे मंदीर बांधण्यास विरोध केला होता. गावकऱ्यांनी हे सांस्कृतिक अतिक्रमण थांबवले. हा नक्कीच एक आदर्श आणि प्रेरणादायी लढा होता. मग ही अशी एका स्त्रीच्याच मंदिरात स्त्रीत्वाला प्रवेश नाकारण्याची अनैतिक रूढी त्यांनी का लादून घेतली आहे? आपला आदिवासी समाज हा स्त्रियांना समानतेचा दर्जा देणारा समाज आहे, असे अभिमानाने म्हटले जात असताना, एका आदिवासी स्त्रीच्या मंदिरात मात्र स्त्रियांनाच अशी बंदी घालणे पूर्णपणे चुकीचे नाही काय? असेही भांगरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
नगर जिल्ह्याने काही वर्षांपूर्वीच शनिशिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश मिळवून देत स्त्रीपुरुष समानतेचे आदर्श उदाहरण घालून दिले. अकोले तालुका जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिवीरांचा तालुका आहे. म्हणून मी बारी ग्रामस्थ, अकोले तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी एका स्त्रीच्याच मंदिरात स्त्रियांवर अन्याय करणारी ही अनैतिक प्रवेशबंदी तात्काळ उठवून एक आदर्श उदाहरण घालून द्यावे.
-राहुल भांगरे, गिर्यारोहक, अकोले
भांगरे यांच्या पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेची तातडीने दखल घेत राज्य महिला आयोगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना पत्र पाठविले आहे. चाकणकर यांनी म्हटले आहे की, स्त्रियांना घटनेने मुलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. स्त्री पुरुष समानतेच्या युगात स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणे गंभीर बाब आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यता तपासून मंदिर प्रशासनास योग्य ते आदेश द्यावेत.