काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप सोबत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमध्ये काय राहिलं आहे? असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याला आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून काँग्रेसमध्ये काय राहिल आहे हे ७ जूनला महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत असून ती ताकदीने उभी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद काय आहे, हे या लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसेल, असे आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत.
तसेच सांगली लोकसभा जागेचे पडसाद कोल्हापुरात नाहीत, शिवसेना ताकतीने काम करत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील शाहू महाराजांकडे येऊन गेले. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. मात्र सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत. सांगलीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे, त्यांनी निर्णय घेतला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे, काँग्रेस म्हणून आमचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
ही निवडणूक म्हणजे वैचारिक लढाई
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वैचारिक लढाई सुरू आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये शाहू महाराजांनी उतरावे अशी कोल्हापूरकरांची इच्छा होती. देशात सध्या गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. या वातावरणात शाहू महाराजांच्या रूपाने निर्णायक भूमिका लोकांमधून दिल्लीत जावी म्हणून ते लोकसभेला उभारले आहेत. वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणे अपेक्षित नाही. आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं यासाठी लोक आसुलेले आहेत. शाहू महाराजांच्या संदर्भात चुकीचे मेसेजेस पसरवले जात आहेत. मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मी स्वतः तीन दिवसापूर्वी ही तक्रार दिली असल्याचं सांगून ‘मान गादीला-मतही गादीला’ अशी मोहीम आम्ही सुरू केलेली आहे.
महाविकास आघाडी राजू शेट्टींसोबत
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अद्याप हातकणंगलेची जागा घोषित केलेली नाही, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अद्याप देखील चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा केली. सर्वांचे मत आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या बाजूने राहावे असे आहे, यातच आता वंचितने हातकणंगले लोकसभेत उमेदवार दिले असल्याने आज किंवा उद्या याचा निर्णय होणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.
धंगेकरांचं कर्तृत्व महत्त्वाचं
पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आठवी पास नावाचं कॅम्पेनिंग सुरू आहे. याबाबत विचारलं असता, अशिक्षित शिक्षित हा विषय करण्यापेक्षा कर्तृत्व कुणाचं आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा, आमदार रवींद्र धंगेकर हे पुणेकरांचा उमेदवार आहे. त्यांचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे, आमचा उमेदवार कार्यक्षमता आणि सामान्य माणसाला उमेदवार आपला वाटतो, शिकलेला उमेदवार आपला वाटत नसेल तर दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नसल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.