• Sat. Sep 21st, 2024
ग्राहकांना आजपासून वीजदरवाढीचा शॉक, लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाची काहिली वाढत असतानाच, आजपासून (एक एप्रिल) राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता येणारी वीजबिले ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झटका देणार आहेत.राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असतानाच, ‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार वीजदरात सरासरी २१.६५ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षांत (२०२३-२४) वीजबिलात सरासरी ७.२५ टक्के, तर या आर्थिक वर्षांत (२०२४-२५) वीजबिलात ७.५० टक्के अशी एकूण सरासरी १४.७५ टक्के वाढ झाली आहे. स्थिर आकारातही गेल्या वर्षी १० आणि यंदाच्या वर्षी १० अशी २० टक्के वाढ झाल्याचे वीजग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना हा वीजदरवाढीचा झटका बसणार आहे.
खैरेंसह महायुतीचं टेन्शन वाढणार, माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात, मराठा मतं मिळवण्याचा दावा

लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ

वीजवापर (युनिट्स) २०२३-२४चे प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार) २०२४-२५चे नवीन प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार)

० ते १०० ५.५८ रुपये ५.८८ रुपये

१०१ ते ३०० १०.८१ रुपये ११.४६ रुपये

३०१ ते ५०० १४.७८ रुपये १५.७२ रुपये

५०१ ते १००० १६.७४ रुपये १७.८१ रुपये

स्थिर आकारात वाढ

वर्गवारी २०२३-२४चा स्थिर/मागणी आकार २०२४-२५ चा स्थिर/मागणी आकार

लघुदाब घरगुती ११६ रुपये प्रति महिना १२८ रुपये प्रति महिना

(स्रोत : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना)

वीजगळती आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे होणारा तोटा वीजदरवाढीच्या स्वरूपात जनतेच्या माथी मारला जात आहे. हा तोटा रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याकडे सरकार, वीज नियामक आयोग आणि ‘महावितरण’ कंपनी लक्ष देत नाही.

– प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed