औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन दिवसात महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. ही तिरंगी लढत होणार असतानाच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही लढत चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.
‘मराठा आरक्षणासाठी ज्यांनी काम केले त्यांना पाठिंबा द्या आणि ज्यांनी काम केले नाही त्यांना पाडा असा सूचक संदेश मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना तीन लाख ८० हजार मते, खैरे यांना तीन लाख ७० हजार आणि मला दोन लाख ८० हजार मते मिळाली होती.’, असे जाधव यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘आता वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत नाही. शिवसेनेतील फुटीमुळे खैरे यांची मते घटली आहेत. या परिस्थितीत माझ्या मतदानात वाढ होणार आहे. तीनशे गावांनी सह्यांची मोहीम राबवून जरांगे यांच्याकडे माझे नाव सुचविले आहे. लोकांचा पाठिंबा वाढत असल्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे’, असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाधव यांनी निवडणुकीच्या नियोजनास सुरुवात केली आहे.