तसेच,महाविकास आघाडी ही थेट मोदी आणि भाजपला अंगावर घेत नाही, माझ्यात ती ताकद आहे, हेच त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं, असं म्हणत त्यांनी थेट काँग्रेसला सुनावलं आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
तुम्ही आधी तुमची भांडणं मिटवा म्हणजे आम्हाला मतदारसंघ मागायला सोपे होतील, आम्ही सातत्याने अशीच भूमिका घेतली. पण, त्यांचं भांडण मिटत नव्हतं. म्हणून वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजे ते सांगत नाही, असं त्यांच्याद्वारे प्रसार माध्यमांमधून समोर येऊ लागलं. जिथे त्यांचंच ठरत नाही तिथे आम्ही जाऊन आणखी बिघाड होण्याची परिस्थिती होती ती टाळण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काही भूमिका घेतल्या.
मविआतील सात जागांवर पाठिंबा देणार, असं पत्र आम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं. कोल्हापूर-नागपूर जागांवरील पाठिंबाही जाहीर केला, इतर जागांबाबत त्यांच्याकडून निर्णय आल्यावर पाठिंबा जाहीर करु.
या सगळ्या गोंधळात काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की ज्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांविरोधात लढत आहेत. १४-१६ मतदारसंघात ही स्थिती आहे. जिथे समझौता होणार आणि जिथे समझौता होणार नाही, तिथे जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे. उरल्या दोन पक्षांचं त्या मतदारसंघात काहीही अस्तित्व नाही. त्याचं कारण म्हणजे हे पक्ष २०-२५ वर्ष युतीच्या राजकारणात लढले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना लढत आली आहे, ते तेच मतदारसंघ ते मागत आहेत. जिथे ताकद नाही तिथे ते जागा मागत नाहीत.
भाजपबाबत जी चर्चा सुरु आहे त्यानुसार त्यांना इतके पक्ष-लोक घ्यायची काय गरज आहे. तर त्यालाही हेच कारण आहे की जिथे ते लढले नाहीत तिथे त्यांचं प्राबल्य नाही, ते मिळवण्यासाठी म्हणून ते उमेदवार पळवण्याचा, पक्ष फोडून भाजपात सामील करण्याचा प्रकार करत आहेत. तसेच, मनसे सारखा पक्षही आपल्यात घेण्याचा प्रयत्न सुरुये.
हे जेही पक्ष लढत आहेत, त्यांची त्या-त्या मतदारसंघात ताकद आहे. इतर मतदारसंघात त्यांची ताकद नाही. म्हणून आम्ही म्हणालो होतो वंचित बहुजन आघाडी त्याठिकाणी एक कॅटलिस्टचा रोल प्ले करु शकते.
पारंपारिक ज्या ठिकाणी आपण लढत आलेले आहात, त्याची फेरमांडणी जर केली, तर आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल अशी परिस्थिती आहे. पण, त्यात दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे असं मी मानतो.
पहिलं म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण, वंचितांचं विस्थापितांचं राजकारण. प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण या निवडणुकीत करु, त्याला तिनही पक्षांचा विरोध आहे. यातून बाहेर पडायचं कसं म्हणून आम्ही तुम्हाला तीन-दोन जागा देतो असं त्यांनी सांगितलं.
मुंबईतील राहुल गांधींच्या सभेत, आमचं मोदींशी भांडण नाही, अदृश्यशक्तीशी भांडण आहे, असं दिसलं. निवडणुकीत जो पक्ष आहे त्याला अंगावर घ्यावं लागतं, त्यावर टीका करावी लागते, त्याचा दहा वर्षांचा काळ लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडावं लागतं, हे मी मांडेल म्हणून त्या सभेत मला फक्त ५ मिनिटं देण्यात आली. भाजप, आरएसएस आणि मोदी यांना सरळ अंगावर घेण्याची ताकद, ही अडचणीची होती.
दुसरा भाग म्हणजे, विस्थापितांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास प्रस्थापितांचा कायम विरोध राहिला आहे. या प्रस्थापितांनीच काँग्रेस, भाजप, एनसीपी, शिवसेना ताब्यात घेतली आहे. त्यामुळे यांचे निवडून आलेले आमदार-खासदार एकमेकांशी निगडीत आहेत.
ज्या उमेदवारांची नावं चार मतदारसंघात घोषित करण्यात आली आहेत, ते विस्थापितांपैकी आहे. आमचा आग्रह असा होता की या विस्थापितांना घेऊन सत्तेत गेलं पाहिजे, हे मान्य झालं नाही, त्यांची भांडणं मिटली नाहीत. निवडणूक जवळ आली, आमच्या तयारीच्या जोरावर आम्ही या निवडणुकीत एक आघाडी म्हणून उभं राहात आहोत, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ लढवणार असं जाहीर करतो.