सामाजिक समीकरण
या मतदारसंघात जवळपास १७ लाख मतदारांची नोंदणी यंदा करण्यात आली आहे. या एकूण मतदारांपैकी जवळपास ३ लाख २८ हजार ४३२ म्हणजेच १८.८ टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्याबरोबरच बुद्धिस्ट मतदारांची संख्याही ५.०३ टक्के इतकी आहे. अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या जवळपास ६७ हजार ९६० इतकी असून एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या ३.९ टक्के आहे. तर अनुसूचित जमातीतील एकूण मतदार ०.९ टक्के असून सुमारे १५ हजार ६८३ मतदारांची नोंदणी असल्याचे कळते. मुख्य म्हणजे, उत्तर भारतीय मतदारांची संख्याही या मतदारसंघात जास्त आहे. या मतदारसंघातील जवळपास ३.७ टक्के मतदार उत्तर भारतीय आहेत.
लोकसभा व विधानसभा निकाल
सन २०१४मध्ये मोदी लाटेत या मतदारसंघात शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी विजय मिळविला. जवळपास ४ लाख ६४ हजार ८२० मते मिळवित त्यांनी हा विजय संपादन केला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे गुरुदास कामत यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी कामतांच्या पारड्यात २ लाख ८१ हजार ७९२ मते मिळाली होती. त्यावेळी मनसेच्या महेश मांजरेकर यांनी जवळपास ६६ हजार मते मिळविली होती. २०१९मध्येही ही परिस्थिती कायम राहिली. काँग्रेसने यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले संजय निरुपम यांना उत्तर भारतीय चेहरा म्हणून या ठिकाणी संधी दिली. २०१९मध्ये गजानन कीर्तिकर पुन्हा निवडून आले. तेव्हा त्यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येते.
एकूण मतांच्या जवळपास ६० टक्के मते त्यांनी मिळविली. तेव्हा कीर्तीकर यांना ५ लाख ७० हजार ६३ मते मिळाली, त्या तुलनेत संजय निरुपम यांना ३ लाख ९ हजार ७३५ मते मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व (रवींद्र वायकर, शिवसेना शिंदे गट), दिंडोशी (सुनील प्रभू, शिवसेना ठाकरे गट), गोरेगाव (विद्या ठाकूर, भाजप), वर्सोवा (भारती लवेकर, भाजप), अंधेरी पूर्व (अमित साटम, भाजप) आणि अंधेरी पश्चिम (ऋतुजा लटके, शिवसेना ठाकरे गट) अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत, तर उर्वारित दोन मतदारसंघांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असून एका मतदारसंघात अलिकडेच शिंदे गटात गेलेले वायकर आमदार आहेत. यातील अंधेरी पश्चिम मतदारसंघात नुकत्याच झालेल्या २०२२च्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीकडून लढविलेल्या निवडणुकीत जवळपास ६६ हजार ५३० मते मिळविली होती. एकूण मतदानाच्या ७६.८५ टक्के मते लटके यांना मिळाली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नसला तरी जवळपास १२ हजार मते नोटाला देत राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही.
मतदारसंघातील प्रश्न
या मतदारसंघातील मेट्रो कारशेडचा विषय यंदाही कळीचा मुद्दा ठरणार आहे. याशिवाय अंधेरी आणि पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या निवडणुकीतही पुन्हा एकदा तो ऐरणीवर येऊ शकतो.
उमेदवारीचा तिढा
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नसून ठाकरे गटाने एकतर्फी घोषणा केल्याचा आरोप करत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार संजय निरुपम यांनी तीव्र शब्दात याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते. या मतदारसंघातील मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांवर भिस्त ठेवत त्यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला होता. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने त्यांच्या पदरी आता तरी निराशाच पडली आहे.
दुसरीकडे, महायुतीकडून मात्र ही जागा अद्याप कोणाच्या वाट्याला येते, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. गजानन कीर्तिकर यांचे वय लक्षात घेता त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र वायकरांनी नकार दिल्याने शिंदे गटाकडून इतर काही नावांची चाचपणी सुरू असून त्यात अभिनेता गोविंदा आहुजा यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. तर, मुंबईतील इतर काही मतदारसंघाची अदलाबदल करण्याची तयारी शिंदे गटाने दाखविल्याने भाजपने या मतदारसंघासाठी काही नावांची चाचपणी सुरू केल्याचेही कळते. या मतदारसंघासाठी येत्या काळात उमेदवार आयात करण्याची तयारीही भाजपने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला संधी मिळते, यावर येथील लढतीत खरी रंगत भरण्याची शक्यता आहे.