• Sun. Nov 10th, 2024
    शिंदेंकडची जागा जाणार? नाशिकचा निर्णय दिल्लीत होणार, गोडसेंची धाकधूक वाढली

    शुभम बोडके, नाशिक : लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार अशी चर्चा होती. मात्र या जागेवर भाजपने देखील दावा केल्यामुळे विद्यमान खासदार गोडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यातच नाशिक लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची चर्चाही सुरू आहे. खासदार गोडसेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून ही जागा आपल्याकडेच ठेवावी, अशी विनंती केली. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. रविवारी नाशिकमध्ये भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना नाशिकच्या जागेसंदर्भात मोठे भाष्य केले.

    मंत्री गिरीश महाजन म्हणाले, नाशिकची जागा ही निवडून येणारी जागा आहे. त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाकडून ही जागा आपल्याकडे मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. नाशिकमध्ये तीन आमदार हे भाजपचे आहे तर नाशिक महानगरपालिकेत देखील भाजपची सत्ता होती. भाजपची ताकद जास्त असल्यामुळे संख्याबळ बघता आम्हालाही वाटतं की भाजपने लढले पाहिजे, परंतु इथे शिवसेनेचा खासदार आहे.
    भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेने शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, शिवसैनिक नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना

    मोदींचे वलय आणि लोकप्रियता असल्यामुळे लोकांनी ठरवलं आहे, त्यांनाच मतदान करायचे. त्यामुळे साहजिकच ही जागा निवडून येणार असल्यामुळे तीनही पक्षांना आपल्याकडे नाशिकची जागा मिळावी अशी इच्छा आहे. मात्र दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाचा एक दोन तीन दिवसात निर्णय होईल आणि उमेदवार जाहीर होईल, असे सांगत दिल्लीवरून हा निर्णय होणार असल्याचे संकेत महाजन यांनी दिले.

    नाशिकची लोकसभेची जागा शिवसेनेला सुटली नाही तर काय?, खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया


    नाशिकची चर्चा बरीच चालू आहे. त्यामुळे नाशिकचे मला माहिती आहे. पण निर्णय हा लवकरात लवकर होईल असे वाटते. नाशिक लोकसभेची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेची सीटिंग जागा आहे. युतीत सोबत असल्यामुळे काहींना हक्काच्या जागा सोडाव्या लागतील तर इतरांना वाटाघाटी करून निर्णय घ्यावे लागतील. राज्यात देवेंद्रजी, बावनकुळे, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. नंतर दिल्लीला पार्लमेंटरी बोर्डाशी चर्चा करून हा सगळा विषय संपेल आणि योग्य तो निर्णय होईल आणि उमेदवार जाहीर केला जाईल, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed