विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची संगमनेरला जाऊन लंके यांनी भेट घेतली. यावेळी थोरात यांनी लंके यांचे कौतुक करीत पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. थोरात म्हणाले, विरोधकांच्या तुलनेत लंके लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार असल्याचेही थोरात म्हणाले.
संगमनेर येथील या भेटीच्यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात व पारनेरचे राहुल झावरे उपस्थित होते. निलेश लंके म्हणाले, थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मियता आहे, त्यामध्ये थोरात आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. त्यांचा आशीर्वाद राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा पळणारा कार्यकर्ता, अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. अहमदनगरमध्ये समोरचा उमेदवार मोठा आहे, मात्र लंके लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार असून लंके यांना नक्की यश येईल, असेही थोरात म्हणाले.