• Mon. Nov 25th, 2024
    धाराशीवमध्ये ‘राष्ट्रवादीची’ एन्ट्री, शिंदेसेना-भाजपही आग्रही, महायुतीत पेच

    म. टा. विशेष प्रतिनिधी, धाराशीव : उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेकडून या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, अजूनही तीनही पक्षांत जागांच्या वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

    धाराशीव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासमोर कोण असणार याची चर्चा पंधरा दिवसांपासून सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही महायुतीतील पक्षांकडून दावा केला जात आहे. या पक्षांची जिल्ह्यांतील शिष्टमंडळे, आमदार, पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. आपल्याकडेच जागा कशी राहावी यासाठी पक्षश्रेष्ठी व मित्रपक्षांच्या नेत्यांसमोर सादरीकरण केले जात आहे. या पक्षाकडे, उद्या त्या पक्षाकडे, परवा तिसऱ्या पक्षाला जागा सुटली अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही त्याबाबत ठोस निर्णय कळविलेला नाही.
    उमेदवारीआधीच भुजबळ रिजेक्ट, नाशिकच्या ‘या’ गावाच्या वेशीवर लागले गावबंदीचे बॅनर
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपात धाराशीव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे. अजितदादांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, सुरेश बिराजदार यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. याशिवाय अन्य एका नेत्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते यासाठी आणखी एक दोन दिवस वाट पाहावी लागेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे भाजप व शिवसेनेकडूनही जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. एकूणच धाराशीव महायुतीतून कोण लढणार याची चर्चा अजून सुरूच आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *