मुंबईतील काही जागा शिवसेना (उबाठा), शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप यांनी जाहीर केल्या असल्या तरी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्याप जाहीर केलेली नाही. असे असले तरी या लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या क्षीण झालेल्या ताकदीचा विचार करता उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघच केवळ असा आहे की, ज्यात काँग्रेस पक्ष जोरदार लढत देऊ शकतो. याचे मुख्य कारण या मतदारसंघाचे सामाजिक समीकरण.
सामाजिक समीकरण
मुंबईतील सहापैकी सर्वाधिक मुस्लिम याच मतदारसंघात आहेत. साधारण १७ लाख मतदारांपैकी ४.७५ लाख मुस्लिम, ४.५० लाख मराठी, ८० हजार ख्रिश्चन, १.३० लाख दलित, २.९० हजार उत्तर भारतीय, १.१५ लाख दक्षिण भारतीय, १.८० लाख गुजराती-मारवाडी असे या मतदारसंघाचे सामाजिक समीकरण आहे.
मागील निकालांचे संदेश
२०१४ साली लोकसभेला मोदी लाट आली आणि यात भाजपच्या पूनम महाजन जवळपास १.८० लाखांच्या मताधिक्याने काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करून जिंकल्या. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती तुटली व दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. यात वांद्रे (पश्चिम) – आशिष शेलार (भाजप), वांद्रे पूर्व – बाळा (प्रकाश) सावंत (शिवसेना), विलेपार्ले – पराग अळवणी (भाजप), कलिना – संजय पोतनीस (शिवसेना), कुर्ला नेहरूनगर – मंगेश कुडाळकर (शिवसेना), चांदिवली – नसिम खान (काँग्रेस) असे विजयी झाले होते.
पुढे २०१९ सालच्या निवडणुकीपूर्वी बाळा सावंत यांचे निधन झाले व त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. २०१९ साली पूनम महाजन पुन्हा विजयी झाल्या; मात्र त्यांचे मताधिक्य साधारण ५० हजार मतांनी घटले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काही फेरफार सोडता शिवसेना-भाजपचेच मताधिक्य राहिले. २०१९च्या विधानसभेत चांदिवलीतून नसीम खान ४०० मतांनी पराभूत झाले व शिवसेनेचे दिलीप लांडे जिंकले, तर वांद्रे पूर्व येथे शिवसेना पराभूत होऊन तिथे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी जिंकले. २०१४ साली शिवसेना वेगळी लढली, तेव्हा या सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये मिळून २.२५ लाख मते मिळाली होती. याचा अर्थ भाजपच्या पूनम महाजन यांच्या विजयात या मतांचाही कायम वाटा राहिला आहे.
मतदारसंघातील प्रश्न
या मतदारसंघात एकीकडे बॉलिवूड स्टार राहणारा अत्यंत अभिजन असा पाली हिल हा भाग येतो; तसेच चांदिवली, कुर्ला नेहरू नगर येथील छोट्या चाळी व झोपडपट्ट्याही येतात. त्यामुळे अभिजनांच्या ट्रॅफिकच्या प्रश्नांपासून सर्वसामान्यांचे घरांचे प्रश्न, विशेषतः विमानतळ परिसरातील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न आदी अनेक प्रश्न आहेत.
काँग्रेसला आशा
काँग्रेस पक्षाला वाटत असलेली आशा ही नेमकी शिवसेनेची मराठी मते व मुस्लिम मते यांच्यामुळेच आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई व कोकणातील व देशावरील मराठी माणसांमध्ये याची सल मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे याचा परिणाम होऊन महाविकास आघाडीच्या पारड्यातच विजयाची माळ पडेल, असे काँग्रेसला वाटते.
भाजपला विश्वास
भाजपकडे सर्वांत मोठा प्रचाराचा मुद्दा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यामुळे कोणी कसलीही समीकरणे मांडली, तरी अंतिमतः विजय भाजपचाच होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे. तसेच या मतदारसंघात भाजपकडून संभाव्य उमेदवारांच्या यादीत असलेले आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः वांद्रे पश्चिम या कॉस्मोपॉलिटन मतदारसंघातून दोनदा विजयी झालेले आहेत. कार्यकर्ते व निवडणूक यंत्रणा हाताळण्यामध्ये ते वाकबगार मानले जातात. संघटना विकलांग असलेल्या काँग्रेससमोर असा उमेदवार आल्यास त्यांच्यासाठी ते मोठे आव्हान असेल.
मुख्य तिढा
या मतदारसंघात अद्याप महायुती वा महाविकास आघाडी कोणाचाच उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजपच्या संभाव्य नावांमध्ये पूनम महाजन यांच्यासोबतच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग शहा व गेल्या काही दिवसांपासून अनुराधा पौडवाल यांचेही नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसमध्ये नसिम खान, राज बब्बर, भाई जगताप ही नावे चर्चेत आहेत. राज बब्बर हे सिने अभिनेते व काँग्रेस पक्षाच्या राजकारणात मुरलेले राजकारणी आहेत. तर भाई जगताप हा मुंबईतील काँग्रेसचा मराठी चेहरा आहे.
या दोघांकडेही शिवसेना उबाठाची मते चांगल्या प्रकारे वळतील, अशी शक्यता आहे. मात्र, नसिम खान उमेदवार असल्यास ठाकरे गटाची मते कमी प्रमाणात वळू शकतात. त्यातील काही मते ही हिंदुत्वाच्या नावावर भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र या मतदारसंघात एमआयएमचाही उमेदवार असेल. मुंबईत माविआने एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याचा प्रचार या पक्षाला करायला मिळाल्यास या पक्षाला मिळणारा मुस्लिम मतांचा टक्का वाढू शकतो व त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो काँग्रेसपुढचा हा सर्वांत मोठा तिढा आहे.