अहमदनगर (शिर्डी) : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. जसं जसं उन्हाचा पारा चढतोय तसेच राजकारण देखील तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने उत्कर्षा रूपवते उमेदवारी पासून ‘वंचित’ राहिल्या. आता रुपवते त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. रुपवतेंनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने आगामी निवडणूक उत्कर्षा रुपवते वंचितच्या तिकिटावर लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदार जास्त असल्याने या ठिकाणी बौद्ध उमेदवार द्यावा, अशी मागणी अनेक बौद्ध संघटनांनी केली आहे. तसेच बौद्ध समाजातील उत्कर्षा रुपवते देखील गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आयात भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज उत्कर्षा रुपवतेंनी वंचितचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे. उत्कर्ष रुपवते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांची डोकेदुखी वाढणार असून त्यांना मत विभाजनाचा फटका बसेल. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता वेगळी चुल मांडली आहे. त्यामुळे अनेकजण प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला पोहोचत आहेत. उत्कर्षा रुपवते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी बंडखोरी करत इतर पर्याय निवडला तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळामध्ये उत्कर्षा यांचे बंड थंड करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी होणार की उत्कर्षा रुपवते वंचितकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.