• Mon. Nov 25th, 2024

    पेट्रोलपेक्षा महाग झाले लिंबू! किलोला १५० ते २०० रुपयांचा भाव, जाणून घ्या एका लिंबाचा दर

    पेट्रोलपेक्षा महाग झाले लिंबू! किलोला १५० ते २०० रुपयांचा भाव, जाणून घ्या एका लिंबाचा दर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकचा पारा ३९ अंशांवर गेल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नाशिककरांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार समितीसह घाऊक बाजारातही लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी नाशिककरांना पाच रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील लिंबू नाशिकमध्ये भाव खातो आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितीत आंध्र प्रदेश, अहिल्यानगरमधून मोठ्या प्रमाणात लिंबू येतात. आंध्र प्रदेशातील लिंबे आकाराने मोठी असल्याने या लिंबांना अधिक मागणी आहे. सध्या बाजार समितीत अवघी ६० ते ६५ क्विंटल लिंबे दाखल झाली आहेत. त्यामुळे लिंबाला मागणी असून, याचा परिणाम लिंबाच्या भाववाढीवर झाला आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उन्हाचा चटका जाणवत असतो. मात्र, यंदा मार्चअखेरीसच उष्ण लाटांचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलांमुळे मार्च महिन्यातच ही स्थिती असेल तर एप्रिल आणि मेची काय स्थिती असणार, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

    उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबू सरबताची मागणी वाढून लिंबांना अधिक भाव आला आहे. एकीकडे उकाड्याने सर्वसामान्य बेहाल झालेले असतानाच दुसरीकडे शीतपेये म्हणून प्राधान्यक्रम असलेले लिंबू सरबतही नाशिककरांना घाम फोडत आहे. बाजार समितीत लिंबू १०० ते १३० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात हेच दर दीडशेपार गेले आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. एक लिंबू पाच ते सात रुपयांना आणि साठ रुपये डझनप्रमाणे विक्री होत आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबांचे दर असेच चढे राहतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली.

    तमिळनाडूतील ‘या’ मंदिरातील ९ लिंबं विकली सव्वा दोन लाखांना, खरेदीसाठी एकापेक्षा एक बोली, काय कारण?
    दरवर्षी एप्रिल-मेमध्ये लिंबांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे दरातही वाढ होते. मात्र, यंदा मार्चमध्येच ही स्थिती ओढवली आहे. येत्या काळातही दर चढेच राहणार असल्याची शक्यता आहे.- महेश आमले, भाजी विक्रेते

    लिंबूपाणीच्या मागणीत वाढ

    उन्हाचा चटका वाढल्याने दाहकता कमी करण्यासाठी नाशिककरांकडून लिंबूपाण्याची मागणी वाढल्याचे विक्रेते सांगतात. शहरातील वर्दळीच्या भागात, तसेच बसस्थानकांच्या परिसरात लिंबूपाणी विक्रेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. शरीराची ऊर्जा कायम राखण्यासाठी लिंबूपाणी प्रभावी ठरत असल्याने मागणी वाढली आहे. उन्हात काम करीत असल्यास रोज लिंबूपाणी पिणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात उसाच्या रसालाही मागणी वाढते; मात्र लिंबूपाण्याला मागणी वाढली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *